अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील व्यक्तिगत लाभाच्या रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरींच्या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी पाच जिल्हा परिषद गटांसाठी पंचवीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे यांनी केली आहे. सोमवारी (दि.१७) मार्चपासून ही पथके प्रत्यक्ष विहिरीवर जाऊन तपासणी करणार आहेत.
पथकांनी रोजचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना द्यायचा आहे. यामुळे विंधन विहिरीच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यात रोजगार हमीच्या विहिरींमध्ये लाभार्थ्यांची निवड करताना मोठी गडबड झालेली आहे. त्याच्या तक्रारीदेखील नाशिक आयुक्तांपर्यंत झालेल्या आहेत. एका गावात सत्तर ते ऐंशी विहिरी आणि एका गावात एकही विहीर मंजूर नाही.

ज्या लाभार्थ्यांनी एजंटांमार्फत प्रकरणे दाखल केली, त्यांचे काही पैसे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाले. काही गावचे सरपंचदेखील एजंट बनले आहेत. गावातील गरीब लाभार्थ्यांकडून हजारो रुपये घ्यावयाचे व यातील काही पैसे अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यायचे व वाटखर्चीच्या नावाने स्वत: पैसे लुबाडायचे उद्योग झालेले आहेत. नाशिक आयुक्तांनी रोजगार हमीच्या विहिरींच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पथकाकडून पाथर्डी तालुक्यातील विहिरींची तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचा धसका घेऊन पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनीदेखील प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक विस्तार अधिकारी, एक ग्रामसेवक, एक तांत्रीक सहाय्यक व एक वरिष्ठ सहाय्यक व एक कृषी विस्तार अधिकारी, असे पाच जणांचे पथक तयार केले आहे.
पाचही जिल्हा परिषद गटांत पाच पथके तयार करून सोमवार (दि. १७) मार्चपासून हे पथके प्रत्यक्ष विहिरींवर जाऊन तपासणी करणार आहेत. कागदपत्रांची पुन्हा तपासणी करणार आहेत. काही नोकरदार, निवृत्त शासकीय कर्मचारी, सावकार, जास्त उत्पन्न असलेले अनेक लाभार्थी असल्याच्या तक्रारी झाल्याने ही शोधमोहीम सुरू झाली आहे.