अहिल्यानगरच्या उत्तरेकडील उपनगरांचा वेगाने विस्तार होत आहे. लोकसंख्या वाढत असतानाच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. विशेषतः एमआयडीसी, बोल्हेगाव आणि नागापूर या भागांमध्ये घरफोड्या, चोरी, हाणामाऱ्या आणि टोळीयुद्धाच्या घटना सर्रास घडत आहेत. मागील काही महिन्यांत खून, अपहरण, खुनाचा प्रयत्न, आणि सार्वजनिक ठिकाणी धिंड काढण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
एमआयडीसी परिसरात विशेषतः आर्थिक आणि जमिनीच्या व्यवहारांमुळे वाद वाढले आहेत. याशिवाय परराज्यातून आलेल्या कामगारांना लुटण्याचे प्रकारही वाढले आहेत. अनेक वेळा अशा गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यात होत नाही. किरकोळ गुन्हे करणारे तरुण आता सराईत गुन्हेगार बनले आहेत. विशेषतः अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील सहभाग वाढल्याचे दिसून येते.

या भागातील अवैध व्यवसायांमुळे अनेक अल्पवयीन मुले नशेच्या आहारी जात आहेत. प्रारंभी किरकोळ गुन्ह्यांमध्ये असलेली त्यांची भूमिका आता मोठ्या गुन्ह्यांमध्ये दिसून येत आहे. अलीकडे घडलेल्या खून आणि अपहरणाच्या घटनांमध्ये सर्व गुन्हेगार २५ वर्षांखालील आहेत. या भागात युवकांच्या गुन्हेगारीकडे वळण्याच्या प्रमाणाने चिंता वाढवली आहे.
बोल्हेगाव, नागापूर आणि एमआयडीसी हा मोठा आणि वेगाने विकसित होणारा परिसर आहे. मात्र, सध्या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोल्हेगाव समाविष्ट नाही. तोफखाना पोलिस ठाणे हा भाग सांभाळतो, पण त्याचे मुख्यालय पाच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गुन्ह्यांवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी या भागात स्वतंत्र पोलिस ठाणे असावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे. पोलिस अधीक्षकांनी या भागातील अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा. गुन्हेगारी रोखण्यासाठी येथे पोलिस उपअधीक्षक (DySP) दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशीही नागरिक आणि स्थानिक नेत्यांची मागणी आहे.
बोल्हेगाव, नागापूर आणि एमआयडीसी भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत. गुन्हेगारीचा वाढता प्रभाव आणि युवकांचा वाढता सहभाग थांबवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस आणि समाजाने एकत्र येऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा, हा भाग गुन्हेगारीच्या विळख्यात अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.