अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना घडत असून यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही घडत आहेत. आता एका प्रकरणाने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नगर तालुक्यातील एका गावातून एका विवाहित महिलेला धमकावत तिचे बळजबरीने अपहरण करत तिच्यावर नगर मनमाड महामार्गावरील एका हॉटेल मध्ये अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्या महिलेला अकोले येथे नेवून तिच्या जवळील पैसे दागिने घेवून तिला बस स्थानकावर सोडून देण्यात आले. या प्रकरणी तन्वीर शेख, सोहेल शेख व अल्फेज शेख (सर्व रा. देहरे, ता.नगर) यांच्या विरुद्ध नगरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर विवाहित महिला १४ मार्च रोजी संध्याकाळी मुलासाठी जत्रेमधून खेळणी विकत आणते, असे सांगत घरातून बाहेर पडली आणि गायब झाली. रात्री उशिरापर्यंत महिला न आल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला व एमआयडीसी पोलीस ठाण्यात तशी तक्रार देण्यात आली. या महिलेस एका विशिष्ट समाजाच्या मुलांसोबत जाताना काहींनी पाहिले. त्यानुसार लोकांनी शोध सुरू केला असता जवळीलच गावातील हॉटेलमध्ये ते मुक्कामास असल्याचे गावातील लोकांच्या निदर्शनास आले.

हा लव जिहादचा प्रकार असल्याने गावातील वातावरण तापले. १५ मार्चला गावात ग्रामसभा घेण्यात आली. गावातील अतिक्रमणे काढण्याबरोबरच गावात काही नवीन विशिष्ट समाजाच्या लोकांची संख्या काही दिवसात वाढत असून अनेक बाहेरचे लोक या ठिकाणी स्थायिक झाल्याचे गावकरी सांगतात. हे लोक कोठून आले, त्याचे आधार कार्ड, त्यांचे मूळ ठिकाण शोधण्यात यावे व या लोकांना गावातून बाहेर काढण्यात यावे, गावातील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत, असे ठराव करण्यात आले.
हिंदुत्ववादी संघटनांना ही माहिती मिळताच पदाधिकारी गावात दाखल झाले. दरम्यान आ. संग्राम जगताप, पारनेरचे आ. काशिनाथ दाते यांनी या ठिकाणी भेट दिली. ज्या कुटुंबातील महिला होती त्या पीडित कुटुंबातील लोकांना पोलिस संरक्षण मिळावे, तसेच गावातील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत, यासाठी आपणही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान बेपत्ता महिलेचा शोध घेण्यास एमआयडीसी पोलिसांना १६ मार्चला दुपारी यश आले यश आले. अकोले येथून महिलेला ताब्यात घेतले. अकोले पोलिसांच्या मदतीने एमआयडीसी पोलिसांनी महिलेचा शोध घेतला. त्यानंतर रात्री उशिरा पीडित महिलेने फिर्याद दिली. गावातील तन्वीर शेख, सोहेल शेख व अल्फेज शेख यांनी मला व माझ्या मुलाला जीवे मारण्याची तसेच माझी गावात बदनामी करण्याची धमकी देत मला बळजबरीने फोन करून बोलावून घेतले व वाहनात बसवून नेले. नांदगाव शिवारात असलेल्या एका हॉटेल मध्ये तन्वीर शेख याने मला पुन्हा धमकी देत अत्याचार केला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी नगर तेथून बेलापूर, संगमनेर, भंडारदरा असे फिरवले. १६ मार्चला अकोले येथील बसस्थानकावर माझ्याकडील पैसे व दागिने घेवून मला सोडून दिले. त्यानंतर आपण एका महिलेच्या मोबाईल वरून कुटुंबियांना फोन केल्यावर त्या ठिकाणी पोलिस आले व त्यांनी मला एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणल्याचे या महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून तन्वीर शेख, सोहेल शेख व अल्फेज शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.