पारनेर तालुक्यात एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या ५८ वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे.
साहेबराव जऱ्हाड असे या आरोपी शिक्षकाचे नाव असून, पारनेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, साहेबराव जऱ्हाड यांनी मागील ११ महिन्यांपासून (मे-जून २०२४) सतत पीडित मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी व्याकरणाचे पुस्तक भेट देऊन तिच्याशी जवळीक वाढवली. त्यानंतर तिचा फोन नंबर घेतला आणि नियमितपणे तिला फोन करून भेटायला बोलावू लागले.
सुरुवातीला हा प्रकार पीडित मुलीने हसण्यावारी नेला. मात्र, मे २०२४ मध्ये आरोपीने तिला घराबाहेर बोलावून दुचाकीवरून एका आडवाटेला नेले आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. घाबरलेली मुलगी रडू लागली असता, आरोपीने तिला धमकावत कोणाला काही सांगू नको, असे बजावले आणि परत सोडले.
१२ मार्च २०२५ रोजी, आरोपी जऱ्हाड आणि त्याची पत्नी दुचाकीवरून जात असताना, त्यांनी पीडित मुलीच्या बहिणीला रस्त्यात अडवले. त्यांनी तिला जबरदस्तीने धमकावले की, “तुझ्या बहिणीने माझ्याविरोधात शाळेत तक्रार दिली आहे. ती तक्रार मागे घ्यायला सांग, अन्यथा दोघींच्या शिक्षणाचा खेळखंडोबा करेल.”
घरी परतल्यानंतर पीडितेच्या बहिणीने हा प्रकार सांगितला. त्यामुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आणि पीडित मुलीने आपल्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी पारनेर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पारनेर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी साहेबराव जऱ्हाड याला रविवारी (१६ मार्च) अटक केली. त्यानंतर सोमवारी (१७ मार्च) पारनेर न्यायालयात पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आला.न्यायालयाने आरोपी जऱ्हाड याला १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या संपूर्ण घटनेमुळे पालकांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. पालकांनी आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुलीच्या भविष्यात अशा प्रकारे हस्तक्षेप करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी पीडित कुटुंबीयांची आणि ग्रामस्थांची मागणी आहे.