श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी गावात १९ वर्षीय माऊली सतीश गव्हाणे याचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी त्याचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तलवारीने तुकडे करून विहिरीत फेकले. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात सागर दादाभाऊ गव्हाणे (२०) आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.
पोलिस तपासात समोर आले की, आरोपींनी दीड महिन्यांपूर्वीच माऊलीच्या हत्येचा कट रचला होता. ६ मार्च रोजी त्यांनी लुडो गेम खेळण्याच्या बहाण्याने माऊलीला बोलावून घेतले आणि रात्रीच्या वेळी त्याचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या विहिरींमध्ये टाकण्यात आले.

१२ मार्च रोजी दाणेवाडी शिवारातील एका विहिरीत मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शीर, एक हात आणि पाय गायब होते, त्यामुळे ओळख पटविणे कठीण झाले. मात्र, पोलिसांनी परिसरातील इतर विहिरींमध्ये शोध घेतला असता मृताचे शीर आणि इतर अवयव सापडले. यामुळे मृतदेह माऊलीचाच असल्याचे स्पष्ट झाले.
माऊली हा अतिशय शांत स्वभावाचा मुलगा होता. त्याच्या निर्घृण हत्येमुळे दाणेवाडी गाव शोकसंतप्त झाले आहे. ग्रामस्थांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. अंत्यसंस्कारावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे हत्येचा छडा लावला. ६ मार्च रोजी रात्री माऊली आणि आरोपींचे मोबाइल एकाच वेळी स्विच ऑफ झाल्याचे आढळून आले. याच माहितीच्या आधारे पोलिसांना संशय आला आणि अवघ्या चार-पाच दिवसांत गुन्हेगारांचा छडा लागला.
या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. आरोपींनी माऊलीला विश्वासात घेऊन त्याची हत्या केली आणि अमानुषपणे मृतदेहाची चिरफाड केली. एवढेच नाही, तर मृतदेह सापडल्यानंतर आरोपी घटनास्थळी उपस्थित होते, पण पोलिस तपासात त्यांचे बिंग फुटले.गावकऱ्यांनी न्यायाच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यावर धाव घेतली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वांची मागणी आहे.