Pune Flyover : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पुण्यातही गेल्या 14-15 वर्षांच्या काळात अनेक मोठमोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. दरम्यान पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्प अंतर्गत पुण्यात एक नवीन दू-मजली उड्डाणपूल विकसित केला जाणार असून या प्रकल्पामुळे पुणेकरांचा प्रवास वेगवान होणार आहे.
पुण्यात विकसित होणारा हा उड्डाणपूल पुणे ते शिरूर यादरम्यान तयार केला जाणार आहे. या उड्डाणपूल प्रकल्पासाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पात तब्बल 7515 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करून देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या उड्डाणपूलाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार पुणे-शिरूर उड्डाणपूल?
पुणे शिरूर उड्डाणपूल हा दुमजली उड्डाणपूल राहणार आहे. या उड्डाणपुलाची लांबी 54 किलोमीटर इतकी असेल. या उड्डाणपुलामुळे पुणे ते अहिल्यानगर दरम्यानच्या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येणार आहे. पुणे-नगर महामार्ग हा राज्यातील एक महत्त्वाचा महामार्ग आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग असून या महामार्गावर विदर्भ मराठवाड्यासहित निम्मे महाराष्ट्रातील जनता ये-जा करत असते. या मार्गावरून दररोज दीड लाखांच्या वर वाहने प्रवास करत असल्याचा दावा केला जातोय.
विशेष म्हणजे आगामी काळातही या मार्गावर वाहनांची संख्या अशीच वाढत राहणार आहे. सध्या या महामार्गावर वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, सणसवाडी, रांजणगाव, कारेगाव, सरदवाडी, शिरूर या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न तयार झालाय.
याचमुळे एमआयडीसीच्या माध्यमातून पुणे ते शिरूर दरम्यान उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे. हा उड्डाण पूल प्रकल्प डिझाइन, फायनान्स, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर (डीएफबीओटी) या मॉडेलवर सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारला जाणार आहे.
या उड्डाण पुलावर खराडी, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या पाच ठिकाणी एन्ट्री व एक्झिट पॉईंट दिले जाणार आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे. हा एक सहा पदरी उड्डाणपूल प्रकल्प राहणार आहे.
अर्थात या उड्डाणपुलावर सहा लेन राहतील. या प्रकल्पामुळे पुणे ते शिरूर हा प्रवास वेगवान होणार आहे. सध्या पुणे ते शिरूर असा प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना जवळपास दोन ते अडीच तासांचा वेळ लागतोय. वाहतूक कोंडीमुळे पुणे ते शिरूर दरम्यान चा प्रवास खूपच रिस्की झालाय.
यामुळे प्रवाशांचा वेळ जातोय आणि अपघातांची संख्या सुद्धा वाढते आहे. पण जेव्हा पुणे ते शिरूर दरम्यान विकसित होणारा उड्डाणपूल प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होईल तेव्हा हे अंतर फक्त 80 मिनिटात पार करता येणार आहे.