१८ मार्च २०२५ मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या बॉडीगार्डची २०१२ मध्ये हत्या झाली होती त्या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) स्थापन विशेष मोक्का न्यायालयाने सोमवारी छोटा राजन याला निर्दोष सोडले आहे.
विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी राजन याची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली.हा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.राजन हा सध्या दिल्लीत असलेल्या तिहार तुरुंगात कैद आहे.कोर्टाच्या या निकालासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो न्यायालयात उपस्थित होता.

या निकालात त्याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली जात आहे अशी माहिती न्यायालयाने त्याला दिली आणि तसेच तो इतर गुन्ह्यांत किंवा प्रकरणांसाठी कैदेत नसेल तर त्याची लगेच सुटका करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.आरिफ अबुनकर सय्यद हा इक्बाल कासकर याचा अंगरक्षक आणि चालकही होता.
१७ मे २०११ रोजी दोन आरोपींनी दक्षिण मुंबईत त्याची गोळ्या झाडून हत्या केली होती.सय्यदचा खून राजनच्या सांगण्यावरून झाला होता, त्यामुळे राजनवर भारतीय दंड संहिता, मोक्का आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत खून आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपांतर्गत खटला चालवण्यात आला. पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्ये बद्दल जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याने राजन आता तुरुंगातच राहणार असून या व्यतिरिक्त राजनवर अन्य काही खटलेही सुरू आहेत.