१८ मार्च २०२५ मुंबई : रुग्णांना होणारा त्रास बंद होण्यासाठी केईएममध्ये आयुष्मान टॉवर बांधण्यासाठी परवानगी मिळाली आहे.अवयव प्रत्यारोपणासाठी हेलिकॉप्टरमधून अवयव रुग्णालयात लवकर आणण्यासाठी,मुंबईतली गर्दी बघता भविष्यामध्ये ४५ मजली असलेल्या आयुष्मान शताब्दी टॉवरवर हेलिपॅड तयार करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी गेल्याच आठवड्यात या प्रकल्पासाठी मंजुरी दिली असल्यामुळे हा प्रस्ताव महापालिकेच्या आर्किटेक्टकडे पाठवण्यात आला आहे असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

रुग्णांना केईएम रुग्णालयात जागा कमी पडत आहे त्यामुळे शतक महोत्सवी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर तयार करण्यासाठी मंजुरी दिली आहे.रुग्णालयाने याबद्दलचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवली असून या प्रस्तावाला त्यांनी गेल्याच आठवड्यात मंजुरी दिली आहे.
केईएम रुग्णालयाने अवयव प्रत्यारोपणाचे महत्व लक्षात घेऊन ग्रीन कॉरिडॉरच्या पुढे जाऊन विचार केला आहे.सध्या मुंबईच्या गर्दीमुळे ग्रीन कॉरिडॉर देऊनही अवयव प्रत्यारोपणासाठीचे अवयव पोहोचायला उशीर होत आहे.म्हणून याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने हेलिपॅडचा निर्णय घेतला आहे.
७० हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया
रुग्णालयात वर्षाला तब्बल ७० हजारांहून अधिक शस्त्रक्रिया होतात.तसेच किडनी, यकृत आणि हृदय प्रत्यारोपण, ७०० हून अधिक एपिलेप्सी, तर ६०० हून अधिक कॉक्लियर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत.नव्या इमारतीत सेंट्रलाईज्ड म्हणजेच केंद्रीकृत अतिदक्षता आणि निर्जंतुकीकरण आणि शस्त्रक्रिया विभाग असणार आहे.
त्यासाठी मजल्यांची विभागणी केली जाईल,त्यामुळे डॉक्टरांना एकाच ठिकाणी रुग्णांची तपासणी करता येणे शक्य होणार आहे.डॉक्टरांना एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत धावपळ करावी लागणार नाही. तसेच अतिरिक्त मनुष्य बळ सुद्धा लागणार नाही.अशी माहिती केईएम रुग्णालय अधिष्ठाता डॉ. संगीत रावत यांनी दिली.