अहिल्यानगर जिल्ह्यात दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे, एका वृद्धाला आधी अपघातातून जीवदान मिळाले, मात्र काही क्षणांतच दुसऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार टाकळी ढोकश्वर येथे घडला.
नगरकडे जाणाऱ्या सिल्व्हर रंगाच्या अल्टो कारने (वाहन क्रमांक अज्ञात) देवराम सोमा गायकवाड यांना धडक दिली, त्यामुळे ते रस्त्यावर पडले. मात्र, सुदैवाने या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली नाही आणि त्यांचे प्राण वाचले. त्यांनी स्वतःला सावरत उठण्याचा प्रयत्न केला आणि रस्ता ओलांडू लागले.

त्याच क्षणी नगरकडून कल्याणकडे जाणाऱ्या इर्टीगा कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गायकवाड गंभीर जखमी झाले आणि त्यांनी जागीच प्राण सोडले.
दुसऱ्या अपघातानंतर इर्टीगा चालक वाहनासह पसार झाला, मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.गायकवाड यांचे चिरंजीव योहान देवराम गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
या तक्रारीनुसार दोन्ही कार चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक दंडगव्हाळ हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.