Mumbai News : मुंबई पुणे नाशिक नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये घर घेणे म्हणजेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अशी गत झाली आहे. कारण म्हणजे या महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबईमध्ये तर घरांच्या किमती सर्वात जास्त वाढलेल्या दिसतात.
मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर म्हणून ओळखले जात असून या ठिकाणी घरांच्या किमती करोडोमध्ये आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मुंबईत जर घर घ्यायचे असेल तर म्हाडासारख्या संस्थांची मदत घ्यावी लागते.

म्हाडा मुंबईकरांना परवडणाऱ्या रेटमध्ये घर उपलब्ध करून देते. अशातच मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एकीकडे मुंबईमध्ये फ्लॅटच्या किमती करोडो रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत तर दुसरीकडे मुंबईत काही लोकांना फ्लॅट फक्त बारा लाख रुपयांमध्ये मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मुंबईतल्या 12 लाखात स्वतःचे घर मिळणार आहे. मुंबई महापालिकेकडून चार हजार सातशे घरांसाठी लॉटरी काढली जाणार असून ही लॉटरी फक्त मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी राहील आणि यासाठीची अर्ज प्रक्रिया 17 मार्च 2025 पासून सुरू सुद्धा झाली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ही लॉटरी काढण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने या लॉटरी अंतर्गत म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतला असल्याने या संबंधित कर्मचाऱ्यांना स्वस्तात घर खरेदी करता येणे शक्य होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या माध्यमातून काढल्या गेलेल्या या लॉटरीमध्ये मुंबईच्या माहुल परिसरातील घरांचा समावेश आहे. यात 225 चौ. फुटांची 4 हजार 700 घरे समाविष्ट असून त्यांची किंमत 12 लाख 60 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
माहुलमधील सदनिकांमध्ये प्रकल्पबाधित राहायला जात नसल्याने तब्बल 13 हजारांवर घरे रिक्त आहेत. आता या रिक्त सदनिकांची पालिकेला देखभाल करावी लागते. त्यामुळे या सदनिका आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावर विकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
नक्कीच या निर्णयाचा महापालिकेमध्ये काम करणाऱ्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी मधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न अवघ्या काही लाखांमध्ये पूर्ण होणार आहेत. यामुळे महापालिकेच्या या निर्णयाचे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.