अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील पठार भागावरील एका गावात शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी गावात कडकडीत बंद पाळत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. दरम्यान, याप्रकरणी साहेबराव जऱ्हाड या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला असून, त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.
दरम्यान ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.या वेळी गावातील मुख्य चौकात संतप्त प्रतिक्रिया देत पठार भागातील नागरिकांनी शाळेच्या विरोधात अत्यंत संतप्त भूमिका घेतली तर आरोपी शिक्षक साहेबराव जऱ्हाड याला कठोर शासन व्हावे व त्याच्यावर रयत शिक्षण संस्थेनेच कारवाई करून त्याला नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली.

या कटात आणखी सहभागी असलेल्या शिक्षकांवरही गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. त्यानंतर मोर्चा थेट शाळेकडे वळाला. या वेळी आंदोलकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाळेच्या बाहेर काढून काही काळ शाळा बंद केली.
साहेबराव जऱ्हाड या शिक्षका विरोधात दोन दिवसांपूर्वी पारनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचे स्वरूप लक्षत घेता पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी तत्परता दाखवत तत्कळ सदर शिक्षकाला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. तर घटनेचे गांभीर्य ओळखून सदर नामांकित शिक्षण संस्थेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
या वेळी संतप्त ग्रामस्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना जाब विचारला. यापूर्वी आमच्या शाळेत अशाच प्रकारे मुलींना काही शिक्षकांनी त्रास दिला होता. संस्था पातळीवर त्या कथित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई व्हावी, त्यांचे मोबाईल तपासावे. तपासात दोषी अढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून शाळेत ज्येष्ठ अनुभवी शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी,
स्कूल कमिटीवर महिला सदस्य नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी संस्था या शिक्षकांना निश्चित शासन करेल व तसा अहवाल आम्ही संस्थेला पाठवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोषी शिक्षकांवर त्वरित कारवाई न झाल्यास गावातील सदर शिक्षण संस्थेची शाळा बंद करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.