मढी-मायंबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी मोहटा देवस्थानने घेतला मोठा निर्णय

Published on -

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील मढी येथील यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मोहटा देवस्थान समितीतर्फे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने यावर्षीसुद्धा घेतला आहे. येत्या गुरुवारपर्यंत भाविकांच्या सोयीसाठी अहोरात्र मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक मढी ,मायंबा व वृद्धेश्वर येथे रंगपंचमीच्या दिवशी येतात.

भाविकांच्या गर्दीपुढे मंदिरांची दर्शनाची वेळ कमी पडते. त्यामुळे दर्शना अभावी भाविकांना माघारी फिरावे लागू नये म्हणून प्रमुख देवस्थान समित्यांनी गर्दीच्या कालावधी पुरते मंदिर अहोरात्र खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोहटा देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे व सर्व विश्वस्त मंडळाने याबाबत विशेष सुविधा पुरवण्याची सूचना देवस्थान समितीच्या प्रशासनाला केली.

कर्मचाऱ्यांनी अल्पावधीमध्ये नियोजन पूर्ण केले. पहाटेपासूनच नाशिक, पुणे, कल्याण, बोरिवली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, गुजरात, आंध्र प्रदेश, या भागातील भाविकांनी मढी येथे येण्यास प्रारंभ केला. यंदा उन्हाची तीव्रता प्रमाणापेक्षा अधिक असल्याने भाविकांना निवास व्यवस्थेचा मोठा प्रश्न मढी देवस्थान समिती पुढे निर्माण झाला. मोहटा देवस्थान येथे एकाच वेळी २५००० भाविक निवास करू शकतील करण्यात आली आहे.

भाविकांना अस्सल आमटी, भाकरी, गुळाची लापशी व भात असा मेनू महाप्रसाद स्वरूपात दिला. मोहटा देवीचे ठिकाण उंच डोंगरावर असल्याने नैसर्गिक थंड वातावरण तेथे आहे . मोहटा देवस्थान वगळता प्रमुख देवस्थानांमध्ये दर्जेदार व सुसज्ज असे स्वच्छतागृह नाही. पिण्यासाठी सर्व भाविकांना आरओचे पाणी असल्याने भाविकांना विकत पाणीसुद्धा घेण्याची गरज पडत नाही.

मोहटा देवस्थान येथे नवरात्र सदृश गर्दी वाढली असून संपूर्ण परिसर यात्रेकरूंच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. येत्या तीन दिवसांत किमान तीन कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल देवस्थान समिती परिसरात होईल, असा विश्वास विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी व्यक्त केला. वृद्धेश्वर येथील महादेवाचे मंदिरही कालपासून अहोरात्र खुले ठेवण्यात येत असून, या स्थानाकडे नाथसंप्रदायाची जन्मभूमी म्हणून बघितले जाते. येणारा प्रत्येक भाविक मढी, मायंबा व वृद्धेश्वर येथे दर्शन घेऊनच पारंपारिक पद्धतीची नाथ यात्रा पूर्ण करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe