कारखान्याच्या गट कार्यालयात बोगस डॉक्टरचा दवाखाना!

Published on -

आश्वी, १९ मार्च २०२५ – कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत परवाना नसतानाही राजस्थानमधील एका बोगस डॉक्टरकडून आयुर्वेदिक उपचार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या आश्वी विभागीय गट कार्यालयात अवैधरित्या दवाखाना सुरु केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

इम्रान अब्दुल खान (रा. भरतपूर, राजस्थान) आणि भरत मधुकर वर्षे (रा. कनोली) अशी आरोपींची नावे असून, खान हा गट ऑफिसच्या मागील खोलीत रुग्णांवर उपचार करत होता. गुडघेदुखी, पाठदुखी, संधीवात, मणक्याचे विकार, पॅरालेसिस, नस दबणे यांसारख्या आजारांवर तो उपचार देत असल्याचे आढळले.

ही माहिती मिळताच निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तय्यब तांबोळी आणि समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शहनाज शेख यांनी पोलिसांसोबत छापा टाकला.

तपासात खान हा अज्ञात औषधांच्या व्हायलमधून रुग्णांना इंजेक्शन देत असल्याचे स्पष्ट झाले. भरत वर्षेच्या मदतीने हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले.डॉ. तांबोळी यांच्या तक्रारीवरून आश्वी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात हा तोतया डॉक्टर कोल्हार (राहाता तालुका), तसेच आश्वी, औरंगपूर, लोहारे कसारे, ओझर, मनोली (संगमनेर तालुका) येथील अनेक रुग्णांवर उपचार करत असल्याचे समोर आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe