अहिल्यानगर ते पुणे विनाथांबा बससेवा पुन्हा सुरू!

Published on -

१९ मार्च २०२५, अहिल्यानगर : नागरिकांना बसस्थानकांवर आणि एसटी बसगाड्यांमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्यात, बसस्थानकांवर स्वच्छता ठेवली जावी, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था असावी, तसेच अहिल्यानगर ते पुणे विनाथांबा बससेवा त्वरित सुरू व्हावी,

या मागण्यांसाठी शहर भाजपने आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या दबावामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेली अहिल्यानगर ते पुणे विनाथांबा बससेवा अखेर पुन्हा सुरू झाली आहे.

परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांनी याबाबत लेखी आश्वासन दिले आहे. काही दिवसांपूर्वी शहर भाजपने विभाग नियंत्रकांना विविध मागण्या आणि समस्यांबाबत निवेदन सादर केले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नुकत्याच झालेल्या जनता दरबारातही या संदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या होत्या.

मंत्री विखे यांनी अधिकाऱ्यांना सुविधा सुधारण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही ठोस कार्यवाही केली नव्हती, असे दिसून आले.

यामुळे शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत बसस्थानकांवर मूलभूत सुविधांचा मोठा अभाव असल्याचे आढळले.

या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट विभाग नियंत्रकांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन छेडले. तिथे कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कार्यालयात आंदोलन केले.

या आंदोलनात शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी, वसंत लोढा, राजेंद्र काळे, विलास नंदी यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. या दबावामुळे अखेर विनाथांबा बससेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe