श्रीगोंदे तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात केली. चोरी, दरोडे, रस्तालुट, खून, टोळीयुद्ध आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गुंडगिरीद्वारे दहशत निर्माण केली जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दाणेवाडी येथे माऊली सतीश गव्हाणे (वय १९) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेच्या तातडीने तपासासाठी आमदार पाचपुते यांनी अधिवेशनात लक्षवेधी मुद्दा उपस्थित केला.

घटनास्थळी भेट देऊन पाचपुते यांनी पोलिसांना आरोपी लवकरात लवकर अटक करावी, असे निर्देश दिले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत अहिल्यानगर गुन्हे शाखा व बेलवंडी पोलिसांनी खुनाचा छडा लावला.
दरम्यान मुंबई अधिवेशनात या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करून त्यांनी स्थानिक गुंडांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.पकडलेल्या आरोपींना तातडीने सजा व्हावी, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी सुचना केली.
पाचपुते यांनी सोशल मीडियावर चमकणाऱ्या गुंडगिरीच्या प्रवृत्तीवरही चिंता व्यक्त केली. यामुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होत असून, मारामारी व खून यांसारख्या घटनांना ते किरकोळ मानू लागले आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे पोलिसांनी अशा गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.