शिर्डी विमानतळ परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच मादी बिबट्या दोन पिल्लांसह या भागात फिरत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयाने मंत्रालयात वनविभागाशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मिळाली आहे.
शिर्डी विमानतळ प्राधिकरणाने यापूर्वी नाशिक येथील मुख्य वनरक्षक कार्यालय तसेच कोपरगाव वनविभागाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, वनविभागाकडून कोणतेही ठोस प्रत्युत्तर मिळाले नाही. विमानतळ परिसरातील नागरिक आणि साईभक्त यांना बिबट्यांचा धोका वाटू लागल्याने अखेर विमानतळ प्रशासनाने थेट मंत्रालयात पत्रव्यवहार करत हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

शिर्डी विमानतळालगत असलेल्या काकडी गावातील ग्रामस्थांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मंगळवारी ग्रामपंचायतीने अधिकृतरित्या वनविभागाला पत्र पाठवत बिबट्यांना पकडण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. बिबट्यांचा वावर केवळ विमानतळापुरता मर्यादित न राहता आजूबाजूच्या गावांतही वाढत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या विषयावर वनविभाग व विमानतळ प्राधिकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वनविभागाने विमानतळाच्या सुरक्षेवर बोट ठेवत भिंतीची उंची कमी असल्याचा दावा केला. मात्र, विमानतळ प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावत नियमानुसार भिंतीची उंची ९ ते १० फूट असल्याचे स्पष्ट केले. तसेच, यासंबंधी अधिकृत उत्तर लेखी स्वरूपात द्यावे, असे वनविभागाला सांगण्यात आले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात पिंजरे लावण्यात आले असून बिबट्यांना पकडण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. विमानतळाच्या सुरक्षेसाठी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.