पाथर्डी तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मौन बाळगल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी केला आहे. तालुक्यात दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असून, खंडणी मागणारे, अतिक्रमण करणारे आणि मारहाण करणाऱ्या गुंडांची दहशत वाढली आहे.
शेवगाव रोडवरील काही लोकांनी सार्वजनिक व खासगी जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण केले असून, मूळ मालकांना खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात तक्रार दाखल करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. याउलट, अतिक्रमण करणाऱ्या गुंडांनीच मूळ जागा मालकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे.

शहरात एका सुवर्ण व्यवसायिकाच्या तरुण मुलाला गुंडांनी बेदम मारहाण केली असून, या घटनेमुळे गुंडांचा वाढता प्रभाव स्पष्ट झाला आहे. मारहाण झालेल्या तरुणाचे कुटुंब पोलिसांत तक्रार देण्यास घाबरत आहे, त्यामुळे आरोपी खुलेआम फिरत आहेत. पोलिसांना आरोपींची माहिती असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, ही बाब गंभीर असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
पोलिसांनी अतिक्रमण करणारे आणि तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करावी, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता शहर बंद ठेवत पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला जाईल, असा थेट इशारा प्रताप ढाकणे यांनी दिला आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होत असून, पोलिस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.