Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात ‘इतके’ शिक्षक होतायेत अतिरिक्त ! थेट जिल्ह्याबाहेर होणार समायोजन

Published on -

मागील काही वर्षांत संचमान्यता झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची संख्या वारंवार समोर आली. यात अनेक शिक्षक अतिरिक्त झाले व बहुतांशी लोकांची समायोजनही झाले. दरम्यान आता अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा २३९ शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याची माहिती समजली आहे. यांमध्ये मराठीचे २२३ तर उर्दू माध्यमाचे १६ अशा शिक्षकांचा समावेश आहे.अंतिम संचमान्यतेनंतर अतिरीक्त शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीने समायोजन केले जाण्याची शक्यता असून, असे झाल्यास संबंधितांना बाहेरच्या जिल्ह्यात जाण्याची वेळ येईल अशी माहिती समजली आहे.

जिल्हा परिषदेच्या ३५३४ शाळा आहेत. यामध्ये पहिले ते पाचवीच्या वर्गात १ लाख ८३ हजार ४१० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. संचमान्यतेनुसार या विद्यार्थ्यांसाठी ९२७० शिक्षकांची मान्यता आहे. मात्र सध्या या शाळांवर ९४०० शिक्षक कार्यरत असल्याचे समजते. त्यात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये १३० शिक्षक अतिरीक्त ठरत असल्याचे दिसत आहे.

६ ते ८ वीच्या वर्गात १९ हजार ५१५ विद्यार्थी घडे घेत आहेत. त्यांच्यासाठी ९१८ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात आज १०११ शिक्षक कार्यरत असल्याचे आकडेवारी सांगत आहेत. त्यामुळे या ठिकाणीही ९३ शिक्षक हे अतिरीक्त ठरताना दिसत आहे. याशिवाय मुख्याध्यापकांची ४२० पदे मंजूर असून, येथे ४२४ मुख्याध्यापक नियुक्त केलेले आहेत. येथेही चार मुख्याध्यापकांचे समायोजन करावे लागणार आहे.

जिल्ह्यात ८० उर्दू शाळा असून, तिथे ३४६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी १८७ पदे मंजूर असून, प्रत्यक्षात १६६ पदेच भरलेली आहे. येथे २१ पदे रिक्त दिसत आहेत. मात्र सहावी ते आठवीच्या उर्दूच्या १२६९ विद्यार्थ्यांना ६० शिक्षकांची पदे मंजूर असताना, तिथे प्रत्यक्षात ७६ शिक्षक काम करत आहेत. त्यामुळे येथे १६ पदे अतिरीक्त आहेत.

दरम्यान, उर्दूचे अतिरीक्त शिक्षक उर्दू शाळांवर समायोजित होऊ शकतात, मात्र मराठी माध्यमांच्या १४९ शिक्षकांचे समायोजन कोठे करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान, २०२४-२५ च्या संचमान्यतेचे काम सुरू आहे. त्या कंपनीच्या हा टेस्टींग (प्राथमिक) रिपोर्ट आहे. यातील त्रुटी असतील तर त्या दूर करून यात बदल होऊ शकतो, मात्र जर असाच अंतिम अहवाल आला तर अतिरीक्त शिक्षकांचे समायोजन आंतरजिल्हा बदलीने केले जाऊ शकते, अशी माहिती समजली आहे. त्यामुळे आता या शिक्षकांची धडधड वाढली असून पुढे काय कार्यवाही होतेय याकडे शिक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe