Pune Real Estate : गेल्या काही वर्षांमध्ये प्रॉपर्टीचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. प्रॉपर्टीच्या किमती सातत्याने वाढत असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, वसई-विरार अशा विविध महानगरांमध्ये प्रॉपर्टीच्या किमतीत मोठी वाढ झाली असून घर खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट झाली आहे.
हेच कारण आहे की, मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये अनेक जण भाड्याने राहतात. परंतु घर खरेदी करणे जेवढ अवघड आहे तेवढेच भाडे देणे सुद्धा अवघड बनले आहे. पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती जेवढ्या वाढल्या आहेत त्यापेक्षा घर भाडे जास्त वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षांमध्ये सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात घरांच्या किमती 37 टक्क्यांनी वाढल्या आहेत तर दुसरीकडे घर भाडे याच काळात 57 ते 65 टक्क्यांनी वाढले आहे.
अर्थातच घरांच्या किमतीपेक्षा घर भाडे वाढीचा आलेख हा अधिक आहे. दरम्यान आज आपण पुण्यातील सर्वात महागडा परिसर कोणता, कोणत्या भागातील घरभाडे सर्वात जास्त आहे अन त्या ठिकाणी घरांच्या किमती कशा आहेत? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुण्यातील हा परिसर ठरला सर्वात महागडा
पुण्यातील अनेक भागांमध्ये घरांच्या किमती वाढलेल्या आहेत. पण, हिंजवडी आणि वाघोली या परिसरात घरांच्या किमती सर्वाधिक आहेत. या भागात घर भाडे सुद्धा अधिक आहे. खरे तर हा भाग फारच पॉश आहे. या भागात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांची कार्यालये आहेत.
त्यामुळे त्या परिसरातील घरांना आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांकडून मोठी मागणी असते. येथे अनेकजण घर भाड्याने घेतात. यामुळे सहाजिकच घर भाडे सुद्धा या ठिकाणी फारच अधिक आहे. हिंजवडीत 1 हजार चौरस फूट (2 बीएचके) घराची सरासरी किंमत 2024 च्या अखेरीस 7800 रुपयांवर पोहोचली आहे.
2021 च्या अखेरीस हीचं किंमत प्रति चौरसफूट 5 हजार 710 होती. म्हणजे आयटी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या हिंजवडीत घरांच्या किमतीत गेल्या 3 वर्षांत 37 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. हिंजवडी परिसरातील घर भाड्यांबाबत बोलायचं झालं तर 2024 च्या अखेरीस घर भाडे 28 हजार रुपयांवर पोहोचले जे की 2021 च्या आखेरीस 17800 रुपयांच्या दरम्यान होते.
म्हणजेच या परिसरात घर भाडे तब्बल 57 टक्क्यांनी वाढले आहे. पुण्यातील वाघोली परिसराबाबत बोलायचं झालं तर या ठिकाणी गेल्या तीन वर्षात घरांच्या किमती 37% नी आणि घर भाडे गेल्या तीन वर्षात 65 टक्क्यांनी वाढले आहे.
वाघोली मध्ये 2024 च्या अखेरीस 1 हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या टू बीएचके घराची किंमत सहा हजार आठशे रुपये इतकी नमूद करण्यात आली असून 2021 च्या किमती सोबत सध्याच्या किमती कम्पेअर केल्यानंतर यात 37% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचवेळी टू बीएचके घरांसाठीचे घर भाडे 23 हजार पाचशे रुपयांवर पोहोचले आहे 2021 मध्ये या भागात टू बीएचके घरांसाठीचे घरभाडे 14,200 इतके होते.