अहिल्यानगरमध्ये यापूर्वीही अनेक अधिकारी लाचेच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाईही झाली. परंतु लाच घेण्याचे प्रमाण मात्र कमी होत नाही. आता पुन्हा एक अधिकारी लाचेच्या जाळ्यात सापडला आहे.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत भुजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन हा प्रकल्पासाठीचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी तक्रारदारास ४० हजारांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये स्वीकारताना मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) सहाय्यक आयुक्तास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

रमेशकुमार जगन्नाथ धडील (वय ५७, रा. अॅक्वा लाईन रेसिडेन्सी, धोंगडे नगर, नाशिक रोड, नाशिक) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. वरवंडी, ता. राहुरी येथील एका कार्यक्रमात २० मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.
यातील तक्रारदार यांची पत्नी व बहीण यांच्या नावे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत भुजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन हा प्रकल्प मंजूर झाला आहे. शासनाच्या अटी व शर्ती प्रमाणे प्रकल्पाचे कामकाज पूर्ण झालेले आहे. तक्रारदार यांची पत्नी यांच्या नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून आतापर्यंत ३ लाख ८८ हजार ८०० रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच तक्रारदार यांची बहीण यांचे नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून २९ लाख १६ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.
दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे. दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्याकरिता प्रस्ताव शासनास पाठविण्याकरता आरोपी लोकसेवक रमेशकुमार जगन्नाथ धडील, (सहाय्यक आयुक्त, वर्ग-१, मत्स्य व्यवसाय (तांत्रिक), अहिल्यानगर) यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी करत असले बाबतची तक्रार २० मार्च रोजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती.
त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक रमेशकुमार धडील यांनी तक्रारदार यांच्या दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्याकरिता प्रस्ताव शासनास पाठविण्याकरता तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. २० मार्च रोजी वरवंडी, ता. राहुरी येथील गोरक्षनाथ आडसुरे यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी सापळा आयोजित केला
असता तक्रारदार यांच्याकडून आरोपी लोकसेवक रमेशकुमार धडील यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर बाबत आरोपी लोकसेवक धडील यांचेविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष शिंदे, रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, विजय गंगुल, चालक पो.हे.कॉ. दशरथ लाड यांच्या पथकाने केली. त्यांना पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस अंमलदार उमेश मोरे, गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, चालक पो.हे.कॉ. हारुण शेख यांनी सहाय्य केले.