अहिल्यानगर मध्ये एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी, १९ मार्च २०२५ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने चुलत्यासमोरच त्याच्या पुतणीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणात योगेश दातरंगे (पूर्ण नाव माहित नाही) या व्यक्तीविरुद्ध शुक्रवारी तोफखाना पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फिर्यादी आपल्या दोन पुतण्यांना घेऊन कुल्फी खाण्यासाठी गेले होते. रात्री ते मोटारसायकलवरून घरी परतत असताना आरोपीने त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केला. त्याने आपली कार थेट दुचाकीच्या आडवी लावली आणि खाली उतरून फिर्यादीला थांबण्याचा इशारा दिला.
यानंतर आरोपीने दुचाकीला लाथ मारली आणि दगड फेकून हल्ला केला. इतकेच नाही, तर त्याने लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेले फिर्यादी तिथून पुढे पळाले, तेव्हा आरोपीने पीडित मुलीचा हात पकडला आणि तिला जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने “तू माझ्यासोबत चल” असे म्हणत पीडितेचा हात घट्ट पकडला आणि तिला कारमध्ये घेऊन जाण्याचा डाव आखला. मात्र, पीडितेने जोरजोरात ओरडून मदत मागितली. तिच्या आवाजाने परिसरातील नागरिक तिथे जमले आणि त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारामुळे आरोपी घाबरला आणि घटनास्थळावरून पळून गेला. या संपूर्ण घटनेने फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, त्यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणात तोफखाना पोलिसांनी योगेश दातरंगे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.