नगर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर शिवारात बंद पडलेला टोल नाका अनेक दिवसांपासून अपघातांना आमंत्रण देत होता. या टोल गेटमुळे होणाऱ्या सततच्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी तो हटवण्याची मागणी वारंवार केली होती.
मात्र, संबंधित बांधकाम विभागाकडून या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. अखेर गुरुवारी मध्यरात्री एका कंटेनरच्या भीषण अपघाताने हा टोल नाका भुईसपाट झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या घटनेने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या टोल नाक्याची कहाणी बरीच जुनी आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर शिवारात उभारलेला हा टोल नाका आपली मुदत संपल्यानंतरही कायम राहिला. टोल वसुली बंद झाल्यापासून सुमारे आठ वर्षे उलटली, तरीही हा टोल गेट हटवण्यात आला नव्हता.
यामुळे येथे अनेक अपघात घडले आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केला होता. टोल गेटच्या दुभाजकाला धडकून अनेक वाहनांचे नुकसान झाले होते, तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याबाबत सातत्याने आवाज उठवला, परंतु त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली.
गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या अपघाताने मात्र या टोल नाक्याचा अखेरचा अध्याय लिहिला. अहिल्यानगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे लोखंडी रोल घेऊन जाणारा एक कंटेनर (क्रमांक एम.एच.४६ सी.एल.५७४०) या टोल गेटच्या लोखंडी खांबाला जोरदार धडकला.
या धडकेत टोल गेटचे छत थेट महामार्गावर कोसळले आणि एका बाजूचा संपूर्ण भाग उद्ध्वस्त झाला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज मोंढे, सहायक फौजदार मोहम्मद शेख, सुधीर गवारे आणि ज्ञानेश्वर तांदळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रित केली. एका बाजूने वाहने वळवून व्यवस्था सांभाळण्यात आली, तर टोल नाक्याचे पडलेले अवशेष हटवण्यासाठी क्रेनद्वारे दिवसभर काम सुरू होते.
या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा रंगली. बंद पडलेला टोल गेट हटवण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा मागणी केली होती, परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपघाताची वाट पाहावी लागली.
अखेर एका अपघातानेच हा टोल नाका भुईसपाट झाला. स्थानिकांनी बांधकाम विभागावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला असून, येथील वाढत्या अपघातांचा हवाला देत प्रशासनाला दोषी ठरवले आहे. या घटनेने टोल गेट हटवण्याच्या मागणीला आणखी बळ मिळाले आहे.
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा टोल नाका उद्ध्वस्त झाला असला, तरी अहिल्यानगरकडे जाणारा दुसरा टोल नाका अद्यापही बंद अवस्थेत आहे. या ठिकाणीही अपघातांची मालिका कायम असून, ग्रामस्थांनी हा दुसरा टोल नाका तात्काळ हटवण्याची मागणी लावून धरली आहे.