Ahilyanagar News : मुलींसोबत होतंय काय? शहर,उपनगरातून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली गायब

Published on -

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांत प्रचंड वाढलेले दिसून येत आहे. नगर शहर, उपनगरे, तालुका भागात देखील हे प्रमाण वाढलेले दिसते. आता आणखी एक धक्कादायक वृत्त आले आहे. नगर शहर परिसरातून २० मार्च रोजी एकाच दिवशी ३ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्यात. यामध्ये केडगाव, तपोवन रोड, नगर तालुक्यातील तांदळी वडगाव या ठिकाणी असणाऱ्या या मुली आहेत. दरम्यान याबाबत कोतवाली, तोफखाना व नगर तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत नगर तालुक्यातील तांदळी वडगाव शिवारात राहणारी अल्पवयीन मुलगी (वय १६) तिच्या घरी असताना तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या संशय तिच्या आईने व्यक्त केला आहे. तशी फिर्याद त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे मुलीचा शोध घेत आहेत.

दुसऱ्या घटनेत केडगाव उपनगरात राहणारी अल्पवयीन मुलगी (वय १७) २० मार्चला दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. घरात एकटी असताना ती अचानक गायब झाली असून, तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली, मात्र अद्याप तिचा कुठलाही थांगपत्ता लागलेला नाही. तिच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील काही कारणावरून आई आणि मुलीचा किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर फिर्यादी आणि आई दोघी बँकेत कामानिमित्त गेल्या असता मुलगी घरी एकटीच होती. मात्र परत आल्यानंतर ती घरात दिसली नाही. तसेच हॉलमधील एका कोपर्यात मी घर सोडून जात आहे असा मजकूर लिहिलेली चिड्डी आढळून आली. मुलीचे अपहरण केल्याचा संशय फिर्यादीतून व्यक्त करण्यात आला असून पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.

तिसरी घटना नगर शहरातील तपोवन रोडवर घडली आहे. या ठिकाणाहून एक १७ वर्षीय मुलगी कपड्याची बॅग घेऊन २० मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास घराच्या कंपाऊंडचे पाठीमागील बाजूचे भिंतीवरून उडी मारून कुठेतरी निघून गेली आहे. तिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता फूस लावून पळून नेले असल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला आहे. तसेच यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्येही या मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळून नेले होते. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असता तेव्हा ती मिळून आली होती. आता पुन्हा ती गायब झाल्याने तिच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून तोफखाना पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe