संगमनेरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन महिलांची फटकेबाजी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंनी गाजवले संगमनेरचे मैदान

Published on -

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची उपस्थिती, संपूर्ण गजबजलेले मैदान, षटकारा – चौकारांची आतिषबाजी, आणि प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद यामुळे ऐतिहासिक ठरलेल्या ऑस्ट्रेलिया इलेव्हन व संगमनेर इलेव्हन या संघांमध्ये झालेल्या प्रदर्शनीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंनी षटकारा – चौकारांची आतिषबाजी करून मैदान गाजवले. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पुन्हा सुपर ओव्हर मध्ये ऑस्ट्रेलियन इलेव्हन या संघाने 11 धावांनी विजय मिळवला.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर व जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारमहर्षी चषकामध्ये ऑस्ट्रेलिया कॅनबेरा संघ उपस्थित होता. या सामन्यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आयोजक आमदार सत्यजित तांबे, सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, सौ.डॉ.मैथिलीताई तांबे, ॲड.सुहास आहेर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्येकी आठ षटकांच्या झालेल्या या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन इलेव्हन संघामध्ये 6 ऑस्ट्रेलियन व 5 संगमनेर मधील स्थानिक तरुणी तर संगमनेर इलेव्हन मध्ये 6 संगमनेर मधील तरुणी व पाच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश होता.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये कॅनबेराच्या ओलिविया मोरिया, स्टुआर्ट जेम्स, जेम्स अल्विन, अँजेलिना ऍनी, शिवानी मेहता, हॉली ली, गॅब्रियल जॉय, रेचल एमी, ओलिविया केट, जॉय एलिस, ग्रेस लॉन्स, एमी रेनी, चैतन्य मारकवार, नेतली मोर्थ, प्रशिक्षक क्रिस्तेन जॅक आदींचा समावेश होता. याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवलेली संगमनेरची वूमन प्रीमियर लीग मध्ये खेळत असलेली पुनम खेमनर ही सहभाग नोंदवला.

टॉच जिंकून संगमनेर इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आठ षटकांमध्ये त्यांनी 73 धावा केल्या. प्रति उत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने देखील आठ षटकांमध्ये 73 धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हर खेळली गेली आणि या सुपर ओव्हर मध्ये ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाने 11 धावांनी विजय मिळवला. या सामन्यांमध्ये षटकारा – चौकारांची आतिषबाजी ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंनी केली. प्रत्येक चौकार षटकाराच्या वेळेस ढोल ताशांच्या गजरामध्ये मैदान दणाणून जात होते.

यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, ऑस्ट्रेलिया हा प्रगत देश आहे आणि तेथील खेळाडू संगमनेरमध्ये येऊन स्थानिक मुलींबरोबर खेळतायेत हिच स्थानिक मुलींना चांगली संधी आहे. संगमनेर मध्ये अजिंक्य रहाणे, पुनम खेमनर यांसारखे चांगले खेळाडू निर्माण झाले असून आगामी काळामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना मोठी संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सुंदर खेळ केला आणि सुपर ओव्हर मध्ये झालेला थरार हा संगमनेरकर विसरणार नाहीत. यावेळी त्यांनी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे स्वागत केले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, कचेरी मैदान ते क्रीडा संकुल असा हा या मैदानाचा प्रवास असून स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी या मैदानासाठी पुढाकार घेतला व शेतकी संघाची एक एकर जागा मोफत दिली. त्यानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या स्टेडियमचा विकास झाला असून क्रिकेट बॅडमिंटन कुस्तीसह अद्यावत सुविधा निर्माण केल्या आहेत. तालुका स्तरावर लोन असलेले हे मैदान असून दरवर्षी याचा मेंटेनन्सचा खर्च साधारण 25 लाख रुपये आहे. तो विविध योजना राबवून आपण पूर्ण करतो. आगामी 14 एप्रिल ते 14 मे 2025 या काळामध्ये इंटरनॅशनल कोच सह या ठिकाणी शिबिर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना महाराष्ट्रीयन पद्धतीचा गुलाबी फेटा बांधण्यात आला. ट्रॉफी, शाल आणि बुके देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुलाबी फेटा आणि नेव्ही ब्लू स्पोर्ट ड्रेस यामुळे सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू खुलून दिसत होत्या. यावेळी अनेकांनी त्यांच्याबरोबर सेल्फी साठी मोठी गर्दी केली आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ही अगदी हसत खेळत सर्व संगमनेर मधील युवतींबरोबर सेल्फी काढले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मैथिलीताई तांबे यांनी केले. या सामन्याच्या आयोजनासाठी सुहास आहेर,अंबादास आडेप,संदिप लोहे,रमेश नेहे, गिरीश गोरे, जयेश जोशी, आसिफ तांबोळी, संजय गांधी नगरमधील युवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

क्रीडा संकुलाचे ऑस्ट्रेलियन कडून कौतुक

ग्रामीण भागामध्ये असूनही युवकांना खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेले भव्य क्रीडा संकुल, दर्जेदार सुविधा, आंतरराष्ट्रीय सामन्यांप्रमाणे खेळपट्टी व मैदान, आणि येथील प्रेक्षकांचा उत्साह हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे कॅनबेरा संघाच्या कर्णधार एंजलिया ऍनी यांनी म्हणतात प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.

घुलेवाडी येथील गरीब मुलीच्या घरी भेट

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंनी घुलेवाडी म्हसोबा नगर येथे राहणाऱ्या अंजली माघाडे व गायत्री माघाडे या दोन गरीब मुलींच्या घरी भेट दिली. यावेळी समवेत आमदार सत्यजित तांबे, व डॉ.मैथिलीताई तांबे उपस्थित होत्या. या अचानक भेटीने या दोन्ही मुलींना सुखद धक्का दिला याचबरोबर परिसरातील नागरिकांनाही परदेशी पाहुणे आल्याचे मोठे कुतूहल निर्माण झाले. या परिसरात सर्व नागरिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी या मुलींना त्यांची जर्सी भेट दिली. याचबरोबर भारतामध्ये मोठी गुणवत्ता असून आगामी काळात महिला क्रिकेटचे भवितव्य उज्वल असल्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe