Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे ते गाजीपुरदरम्यान रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून द्वि सप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
ही गाडी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून धावणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच वाढत असते यामुळे विविध रेल्वे मार्गांवर समर स्पेशल ट्रेन चालवल्या जातात जेणेकरून अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवता येईल.

दरम्यान आता आपण रेल्वे विभागाच्या माध्यमातून पुणे ते गाझीपूर शहर द्वि-साप्ताहिक विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार पुण्याहून धावणाऱ्या द्विसाप्ताहिक ट्रेनचे वेळापत्रक ?
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गाडी क्र. 01431 पुणे – गाझीपूर शहर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाईल. ही गाडी 8 एप्रिल 2025 ते 27 जून 2025 दरम्यान चालवली जाणार आहे.
ही ट्रेन या कालावधीत शुक्रवार आणि मंगळवारी सकाळी 6:40 वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 20:15 वाजता गाजीपूर शहरात पोहोचणार आहे. या विशेष ट्रेनच्या एकूण 24 फेऱ्या होणार आहेत.
तसेच, गाडी क्रमांक 01432 गाझीपूर शहर – पुणे द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 10 एप्रिल 2025 ते 29 जून 2025 दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी प्रत्येक रविवार आणि गुरुवारी गाजीपुर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
ही गाडी गाजीपुर रेल्वे स्थानकावरून सकाळी 4:20 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4:20 वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीच्या सुद्धा 24 फेऱ्या होणार आहेत. म्हणजेच पुणे ते गाजीपुर अशा 24 आणि गाजीपुर ते पुणे अशा 24 फेऱ्या होतील.
विशेष ट्रेन कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे पुणे ते गाजीपुरदरम्यान सुरू केल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अहिल्यानगर रेल्वे स्थानकाचा सुद्धा समावेश आहे.
दौंड चोर केबिन, अहिल्यानगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महल, कटनी, मेहर, सटाणा, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, वाराणसी, जौनपूर, औंरीहार या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबा घेणार आहे.