राहुरी शहरात २६ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची काही समाजकंटकांनी काळे फासून विटंबना केल्याची घटना घडली. ही घटना बुवासिंदबाबा मंदिर परिसरातील बुवासिंद बाबा तालीम संघात दुपारी १ ते १:३० च्या सुमारास घडली, ज्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि तरुणांनी तालमीभोवती गर्दी करून “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. या प्रकरणी खासदार निलेश लंके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

निलेश लंके यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की, छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे दैवत असून, त्यांच्या पुतळ्याची विटंबना ही कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. त्यांनी पोलिस प्रशासनाला तातडीने या कृत्यामागील माथेफिरूंना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.
सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू असतानाच ते या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन गृह विभागाला पत्र लिहीत त्यांनी या पत्राद्वारे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले. “जय शिवराय” असा नारा देत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या पुतळ्याची विटंबना ही भावनिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील बाब असून, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
खासदार निलेश लंके यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांनी गृह विभागाला पत्र देखील दिल्याने प्रशासनावर दबाव वाढला असून, पोलिसांना तातडीने कारवाई करावी लागणार आहे.