Ahilyanagar News :अहिल्यानगरमध्ये सध्या चोरांचा सुळसुळाट सुरूआहे. अगदी आ. जगताप यांना पोलीस प्रशासनाविरोधात तक्रार करावी लागली आहे. अनेक घटना ताजा असताना आता सोन्याचे बिस्कीट गायब करण्याची घटना घडली आहे.
दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना स्टेशन रोडवरील आगरकर मळा येथील एकता कॉलनी येथे घडली आहे. अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून ही चोरी केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दृष्टीने तपास सुरु केला आहे.

याबाबत अशोकदास लक्ष्मणदास दुबे (वय ६५, रा.एकता कॉलनी, आगरकर मळा, स्टेशनरोड, अ.नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दुबे यांनी चिंतामण रामचंद्र देशमुख अँड सन्स या सराफ दुकानातून १५ ग्रॅम वजनाचे सोने खरेदी केले होते.
ते सोने त्यांनी दोन दिवस घरी ठेवले होते. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दुबे यांनी त्यांच्या घरातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट घरासमोर असलेल्या होंडा कंपनीच्या एक्टिवा मोपेड गाडीच्या (क्र. एम एच १६ सी आर ८४५२) डिक्की मध्ये ठेवून सोने खरेदी केल्याची पावती आणण्याकरिता ते घरात गेले.
घरात जाऊन पावती घेऊन ते पुन्हा गाडी जवळ येऊन चिंतामण देशमुख अँड सन्स या दुकानांमध्ये गेले व त्यांनी गाडीची डिकी पाहिली असता डिक्की मध्ये त्यांनी ठेवलेले सोन्याचे बिस्किट दिसून आले नाही, त्यानंतर त्यांनी पुन्हा घरी जाऊन ज्या ठिकाणी गाडी उभी केली त्या ठिकाणी पाहणी केली असता त्यांना काही एक दिसून आले नाही.
कोणीतरी अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून गाडीचे डिक्कीतील १ लाख ३० हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट चोरुन नेले. त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.