Banking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली आहे. आरबीआय ने काही बँकांचे लायसन्स रद्द केले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील दोन बड्या बँकांवर आरबीआय कडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा अशीच कारवाई मध्यवर्ती बँकेने केली आहे.

केवायसी (नो युअर कस्टमर) संदर्भातील सूचनांचे पालन न केल्यामुळे एचडीएफसी बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेवर मध्यवर्ती बँकेकडून मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान आता आपण आरबीआयने या दोन्ही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यामागचे कारण आणि या बँकांना किती रुपयांचा दंड भरावा लागणार याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच याचा ग्राहकांवर नेमका काय परिणाम होणार याबाबत यात आपण तपशीलवार माहिती पाहणार आहोत.
किती रुपयांचा दंड भरावा लागणार?
आरबीआयने नुकतेच एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करत एचडीएफसी बँकेला 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, पंजाब अँड सिंध बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 68.20 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन्ही बँकांना लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याने या संबंधित बँकांच्या ग्राहकांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण आहे.
काय आहे कारण?
एचडीएफसी बँकेवर हा दंड बँकिंग विनियमन अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(आय) सह कलम 47ए (1) (सी) च्या तरतुदींनुसार लावण्यात आला आहे. 31 मार्च 2023 पर्यंतच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी बँकेचे वैधानिक परीक्षण करण्यात आले होते.
या चौकशीनंतर एचडीएफसी बँकेच्या उत्तरांचे मूल्यांकन करण्यात आले आणि त्यामध्ये आरोप योग्य असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. एचडीएफसी बँकेने त्यांच्या ग्राहकांची जोखीम संकल्पनेनुसार योग्य प्रकारे वर्गवारी केली नव्हती.
लघू, मध्यम आणि उच्च जोखीम श्रेणीप्रमाणे ग्राहकांचे वर्गीकरण करण्यात आले नव्हते. तसेच, प्रत्येक ग्राहकाला विशिष्ट ओळख क्रमांक देण्याऐवजी ठराविक ग्राहकांना समान क्रमांक देण्यात आले होते.
दुसरीकडे, पंजाब अँड सिंध बँकेबाबत बोलायचं झालं तर या बँकेवर देखील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड आकारण्यात आला आहे. बँकिंग विनियमन अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(आय), 51(1) सह कलम 47 ए (1) (सी) च्या तरतुदींनुसार 68.20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
मध्यवर्ती बँकेने या दोन्ही बँकांवर केलेली ही दंडात्मक कारवाई ग्राहकांसाठी चिंतेचा विषय नाहीये. या कारवाईचा ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नाही. मध्यवर्ती बँकेने केलेली ही कारवाई एचडीएफसी बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेवर असून दंडाची रक्कम ही फक्त बँकेकडून वसूल होणार आहे ग्राहकांना एकही रुपया द्यावा लागणार नाही.