पापड-कुरडई ते चकली, उन्हाळ्यात गावाकडच्या महिलांची वाळवणाची लगबग!

Published on -

उन्हाळा आला की गावागावांत एक वेगळीच चैतन्यता येते. हवेत कच्च्या कैरीचा दरवळ, पिकलेल्या आंब्याचा गोड सुगंध, मोगरा-बकुळीची मादकता आणि घराघरांतून येणारा गव्हाच्या चिकाचा खमंग वास यामुळे सगळीकडे उत्साह संचारतो.

उन्हाळा आणि वाळवण ही जोडी तर पूर्वीपासूनच गावाकडच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजही ग्रामीण भागात ही परंपरा कायम आहे. पुढच्या वर्षासाठी साठवणूक म्हणून महिलांची या काळात वाळवणाची लगबग सुरू झाली आहे.

पापड, कुरडई, लोणची, मसाले यांसारख्या पदार्थांनी पावसाळ्यात अन्नाची सोय होते आणि म्हणूनच या कामाला गावात आजही खास महत्त्व आहे.

उन्हाळ्यात सूर्य तळपतो तेव्हा वाळवणासाठी हीच योग्य वेळ असते. या दिवसांत गावाकडच्या बायका वडे, पापड, कुरडई, शेवई, बटाट्याच्या चिप्स, चकली, शाबुदाण्याची चकली असे अनेक पदार्थ बनवतात.

सध्या महिनाभरापासून ऊन चांगलंच चढलं आहे आणि गावात वाळवण हा जणू उत्सवच बनला आहे. घराघरांसमोरच्या अंगणात हे पदार्थ वाळताना दिसतात. हे सगळं वर्षभर पुरेल इतकं असावं, यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे.

गावातल्या शेजारीण बायका एकमेकांना बोलावून, हसत-खेळत हे पदार्थ बनवण्यात एकमेकींची साथ देतात. ही एकजूट आणि परंपरा पाहिली की मन भरून येतं.

सध्या गव्हाच्या शेवया, कुरडया, उडदाच्या डाळीचे वडे, बटाट्याच्या चिप्स, तांदळाच्या पापड्या असे हातचे पदार्थ बनत आहेत. शेवया करण्याचं यंत्र आल्यापासून तर गावातल्या काही जणांना रोजगारही मिळाला आहे.

या उन्हाळी पदार्थांना शहरातून मोठी मागणी आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून गावात बनवलेले हे पदार्थ शहरात विक्रीसाठी पाठवले जातात. आपल्याकडे प्रत्येक सणाला गोडधोड खाण्याची परंपरा आहे, त्यामुळे वर्षभर पुरेल इतकं वाळवण महिलांचे गट एकमेकांच्या मदतीने तयार करतात. हे पाहिलं की ग्रामीण जीवनातली मेहनत आणि एकजूट किती सुंदर आहे, हे जाणवतं.

गव्हाचा चीक म्हटलं की मन थेट बालपणात जातं. उन्हाळ्याच्या सुट्टीतली ती मजा आठवते. एक काळ असा होता, जेव्हा सगळं वर्ष या सुट्टीची वाट पाहायचो. वर्षभरातली सगळ्यात मोठी सुट्टी उन्हाळ्यातच मिळायची. तेव्हा सुट्टी आणि वाळवण ही दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असायच्या. आजही गावाकडच्या घरांमध्ये ही परंपरा जिवंत आहे आणि त्यातून ग्रामीण जीवनाचा आत्मा टिकून आहे, हे पाहून समाधान वाटतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe