पाथर्डी- तालुक्यातील तहसील कार्यालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या कामासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीला “तुझं काम करून देतो” असं सांगून मोटारसायकलवर बसवत एका व्यक्तीने तिला वनदेव परिसरात नेलं आणि तिथे तिच्यासोबत गैरवर्तन केलं.
या प्रकरणी मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी जांभळी गावातील विठ्ठल रघुनाथ मिसाळ या संशयिताला ताब्यात घेतलं आहे. ही घटना २५ मार्च रोजी दुपारी घडली. तालुक्यातील एका गावातून दोन व्यक्ती आपल्या अल्पवयीन नातीला घेऊन तहसील कार्यालयात हयातीचा दाखला काढण्यासाठी आले होते.

संजय गांधी निराधार समितीच्या कार्यालयात त्यांची कामं सुरू असताना, तिथे उपस्थित असलेला विठ्ठल मिसाळ त्यांना भेटला. त्याने या कुटुंबाला सांगितलं, “तुमच्या नातीचं अनुदानाचं काम करून देतो, पण त्यासाठी अहिल्यानगरच्या समाज कल्याण विभागात जावं लागेल.” त्यानंतर त्याने मुलीला “तुझं काम मी करतो, माझ्यासोबत चल” असं म्हणत मोटारसायकलवर बसवलं आणि वनदेव परिसराकडे घेऊन गेला.
तिथे गेल्यावर मुलीने विचारलं, “मला इथे कुठे घेऊन चाललास?” तेव्हा मिसाळने गाडी रस्त्यावर उभी केली आणि तिच्याशी असं वर्तन केलं की तिला लाज वाटेल. तिथून दोन जण मोटारसायकलवरून जात असताना मुलीने त्यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तिला मदत केली आणि तिच्या आजोबांकडे तहसील कार्यालयात परत आणलं.
मिसाळ मात्र तिथून पळून गेला. मुलीने घडलेला सारा प्रकार आजोबांना सांगितला. त्यांनी नायब तहसीलदारांना ही बाब कळवली. नायब तहसीलदारांनी मिसाळला बोलावून “असे प्रकार इथे करू नकोस” अशी समज दिली, पण त्यापलीकडे काहीच कारवाई केली नाही.
अखेर मुलीने पोलिसांत तक्रार नोंदवली आणि पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांनी मिसाळला ताब्यात घेतलं. या प्रकरणाने तहसील कार्यालयात एजंटांचा वाढता सुळसुळाट आणि अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात खासगी लोकांकडून कामं करून घेतली जातात आणि एजंट निराधार लोकांची आर्थिक पिळवणूक करतात.
आता तर ही लूट थेट मुलीच्या अब्रूवर हात टाकण्यापर्यंत गेली आहे. एका अनाथ मुलीला मोटारसायकलवर घेऊन जाऊन तिचा विनयभंग होतो, तरीही महसूल अधिकारी गंभीरपणे का घेत नाहीत, असा सवाल उपस्थित होतोय. या प्रकारानंतर निराधार महिलांनी आमदार मोनिकाताई राजळे यांनी लक्ष घालावं, अशी मागणी केली आहे. हा प्रकार तहसील कार्यालयाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह ठरला आहे.