डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआय, एमआयडीसी अहिल्यानगर या संस्थेचा टी. एन. एस. इंडिया फाउंडेशन सोबत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सामंजस्य करार झाला आहे. टी. एन. एस. इंडिया फाउंडेशन “कॅम्पस टू इंडस्ट्रियल करिअर्स” या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना चांगले करिअर पर्याय निवडण्यासाठी आणि एक मजबूत करिअर मार्ग तयार करण्यासाठी परिवर्तन कार्यबल तयारी कौशल्य प्रशिक्षण प्रदान करते.
हा कार्यक्रम आयटीआय विद्यार्थ्यांच्या वाढत्या गरजांना तोंड देणे, मुलाखतीची तयारी वाढवणे आणि त्यात सुधारणा करणे या उद्देशाने राबवण्यात येत आहे. अंतिम वर्षाच्या आयटीआय विद्यार्थ्यांसाठी रोजगार क्षमता प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सत्रे आणि नोकरीच्या ठिकाणी नियुक्तीसंदर्भात मार्गदर्शन केले जाते. या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना २०० तासांचे सॉफ्ट स्किल्स व ग्रीन स्किल प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआय, एमआयडीसी अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांसाठी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमाद्वारे व्यक्तिगत आणि व्यावसायिक परिणामकारकता वाढवणे, स्वतःची जागरूकता वाढवणे, सामाजिक विचारसरणी आणि टिकाऊपणा विकसित करणे तसेच करिअरची तयारी, प्रभावी संवाद कौशल्य आणि मुलाखत व कामाची तयारी या गोष्टी शिकवण्यात येत आहेत.
ग्रीन स्किल्स प्रशिक्षण अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांसाठी हँड्स-ऑन ट्रेनिंग सुरू आहे, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य ए. व्ही. सूर्यवंशी यांनी दिली. या प्रशिक्षणात विद्यार्थी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, बॅटरी, इलेक्ट्रिक मोटर, ईव्ही चाचणी आणि सिम्युलेटर, ईव्ही नियंत्रक आणि समस्या निवारण यासंबंधी ज्ञान मिळवतात.
आजच्या धावपळीच्या युगात पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण कमी करणे या महत्त्वाच्या समस्या समोर आहेत. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज बनत चालली आहे. पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने हा उत्तम पर्याय ठरत आहे.
आयटीआय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विखे पाटील फाउंडेशन नेहमी तत्पर असते. संस्थेचे चेअरमन व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, तसेच डायरेक्टर पी. एम. गायकवाड, डायरेक्टर सुनील कलापुरे आणि डायरेक्टर डॉ. अभिजीत दिवटे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले.