अहिल्यानगर शहरातील दोन रस्त्यांचे नामकरण होणार आहे. यातील एकाला लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे मार्ग तर दुसऱ्याला स्व. रुक्मिणीबाई काळे आज्जी मार्ग असे नाव देण्यात येणार आहे. हे दोन्ही रस्ते अहिल्यानगर महापालिका हद्दीतील आहेत.
प्रभाग २ मधील निर्मलनगर भागातील डॉ. पाऊलबुद्धे शाळा ते मुळे एसटीडी पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे मार्ग व निर्मलनगर परिसरातील भगवान बाबा अपार्टमेंट ते रोहन रेसिडेन्सी या अंतर्गत रस्त्याचे स्व. रुक्मिणीबाई काळे आज्जी मार्ग नामकरण समारंभ चैत्रपाडवा ३० मार्चला संध्या. ५ वा. आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक निखिल वारे व भाजपाचे गोकुळ काळे यांनी दिली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नानासाहेब जाधव (प्रांत संघचालक पश्चिम महाराष्ट्र प्रांत), आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते नामकरण होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे यशवंत डांगे (आयुक्त, अहिल्यानगर महानगरपालिका), अभय आगरकर (भाजपा शहर जिल्हाध्यक्ष) तसेच प्रमुख उपस्थिती संपत बारस्कर (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), बाबू टायरवाले (जिल्हाप्रमुख शिवसेना), नगरसेविका संध्याताई पवार, विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्र्यंबके, रामदास आंधळे व रुपाली वारे, सचिन पारखी (सरचिटणीस भाजपा), बाबासाहेब सानप (भाजपा नेते) उपस्थित राहणार आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे कार्य सर्वाना माहित आहे,
तळागाळातील लोकांसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. रुक्मिणी काळे आज्जी या धार्मिक सामाजिक क्षेत्रात काम करत होत्या, रुक्मिणी बाई काळे आज्जीतेलीखुंटावर राहत असतांना लंगर बिडी, भिकुसा बिडी मधील बिडी कामगार काम करताना त्याच्यासाठी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी चे वाचन करुन अर्थ सांगत असत. त्यामुळे महिला बिडी कामगारांचा कामाचा स्पीड वाढत होता व परमेश्वराच्या नामस्मरणाचा लाभही होत होता.
यासाठी त्या कुठलाही मोबदला घेत नसत. हेच व्रत निर्मलनगरला आल्यावरही चालु राहीले. हनुमान मंदिरात पोथी वाचन व भजन सुरु केले. येथील महिलांमध्ये अध्यात्माची गोडी निर्माण केली. परीसरात त्या काळे आजी म्हणून सर्व परीचीत होत्या. त्यांच्या नावाने आता याचे नामकरण होणार आहे.