जामखेड तालुक्यातील खैरी मध्यम प्रकल्पातील वीज जोडणी तोडल्यामुळे उसाचे पीक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. गुरुवारी (दि. २७ मार्च) रोजी खर्डा बस स्थानकासमोर शिर्डी – हैदराबाद राज्य मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
याप्रसंगी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे म्हणाले की, जोपर्यंत खैरी मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठा आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे. या परिसरातील हजारो टन ऊस पाण्याच्या प्रतीक्षात आहे. जर वीज बंद ठेवली तर उभ्या पिकाला पाणी देता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असून याचा खर्डा बाजारपेठेवर मोठा आर्थिक परिणाम होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाने आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.

हे रास्तारोको आंदोलन चिघळत असताना खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी मध्यस्थी करून जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना फोन करून माहिती दिली. त्यावेळी बोलताना तहसीलदार म्हणाले की, आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या विनंती अर्ज व भावना मी प्रांतसाहेब कर्जत यांच्यासमोर समक्ष ठेवून चर्चा करतो.
पुढील मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून रास्तारोको आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी मोबाईलद्वारे संभाषण करून केले. यावेळी शेतकऱ्यांनी सोमवार पर्यंत मार्ग काढण्याचे तहसीलदार यांना सांगितले, तसेच तोपर्यंत या परिसरात वीज कर्मचारी पाठवू नये अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.