श्रीरामपूर- शहरात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. मिल्लतनगर पुलावर एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील आरोपी अल्फाज अब्दुल्ला जुनानी ऊर्फ अफ्फान (वय २४, राहणार फातिमा हाय सोसायटी, वॉर्ड नं. ०१, श्रीरामपूर) याला अटक केली.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपला तपास सुरू केला आणि अवघ्या २४ तासांत तपास पूर्ण करून ३६ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पोलिसांच्या या झटपट कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या घटनेनंतर श्रीरामपूर शहर पोलिसांनी दाखवलेली तत्परता खरोखरच प्रशंसनीय आहे. महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे अस्तित्वात आहेत, पण त्याची अंमलबजावणी जलदगतीने होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
पीडितांना त्वरित न्याय मिळावा, या उद्देशाने पोलिसांनी सलग चोवीस तास काम करत हा तपास पूर्ण केला. या प्रकरणातून पोलिसांनी एकप्रकारे समाजाला संदेश दिला आहे की, अशा गुन्ह्यांना कोणतीही सवलत मिळणार नाही आणि पीडितांच्या बाजूने प्रशासन ठामपणे उभे आहे.
या कारवाईमागे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक (श्रीरामपूर) वैभव कलुबर्म आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या स्पष्ट सूचना होत्या.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपासाची जबाबदारी सांभाळली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल अकबर पठाण, अमोल बी. गायकवाड, सोनाली गलांडे आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल अनिता गिते यांनी केला.
या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे प्रकरण इतक्या कमी वेळात न्यायालयापर्यंत पोहोचले.
श्रीरामपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्येही विश्वास निर्माण झाला आहे.
अशा संवेदनशील प्रकरणात जलद कारवाईमुळे पीडितेला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समाजात अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी किती महत्त्वाची आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे इतर गुन्हेगारांनाही चांगलाच धडा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.