कर्जत शहरात गावगुंडांची दादागिरी वाढत चालली आहे. सामाजिक कार्यकर्ते भीमा पखाले यांना फक्त ‘रात्री मोठ्याने गाणी म्हणू नको’ असे सांगितल्याच्या रागातून टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली.
ही घटना घडूनही पोलिसांनी तब्बल चार दिवसांनी गुन्हा दाखल केला, ज्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल नाराजी पसरली आहे. या प्रकाराने कर्जतमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही घटना शनिवारी (ता. २२) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. भीमा पखाले यांनी त्यांचे ‘झोपडी कॅन्टीन’ नावाचे छोटे हॉटेल बंद केले आणि हॉटेलमागे गाय बांधण्यासाठी गेले.
तिथे कार्तिक नीलेश गुंड (राहणार कुळधरण रोड, कर्जत) हा दारूच्या नशेत मोठमोठ्याने गाणी म्हणत होता. पखाले यांनी त्याला शांतपणे सांगितले, “मोठ्याने गाणी म्हणू नको, इथून निघून जा.” पण हे सांगणे कार्तिकला पटले नाही.
त्याने रागाच्या भरात फोन करून आपले मित्र गणेश भैलूमे, बंटी शिंदे, सिद्धार्थ साळवे आणि आणखी तीन-चार जणांना बोलावून घेतले. हे सर्वजण मोटारसायकलवर तिथे पोहोचले आणि लाकडी काठ्या आणि लोखंडी रॉडने पखाले यांच्यावर हल्ला चढवला. मारहाणीत पखाले गंभीर जखमी झाले.
पखाले यांचा आवाज ऐकून त्यांची पत्नी आणि मेहुणी घटनास्थळी धावून आल्या. त्यांना पाहताच आरोपी तिथून पळून गेले. जखमी अवस्थेत पखालेंना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ते स्वतः पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, पण पोलिसांनी त्यांना थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाण्यास सांगितले. मात्र, मेंदूला सूज आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.
काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, पण पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. ‘रुग्णालयात येऊन गुन्हा दाखल करू,’ असे पोलिसांनी सांगितले, पण ते रुग्णालयात गेले नाहीत.
अखेर बुधवारी पखाले रुग्णालयातून घरी आल्यानंतर पुन्हा पोलिस ठाण्यात गेले, तेव्हा कुठे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची उदासीनता स्पष्ट दिसून आली.
कर्जत हा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार या दोन मोठ्या नेत्यांचा मतदारसंघ असूनही, इथली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनली आहे.
बीडप्रमाणेच कर्जतमध्येही विशिष्ट टोळक्यांकडून दहशत माजवली जात असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. या घटनेने पोलिस आणि प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.