कर्जत- कर्जतमध्ये सुरू असलेल्या ६६ व्या महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.
ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली असून, दुसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यातील कोरेगावचा सचिन मुरकुटे याने ५७ किलो वजनी गटात गादी विभागात बाजी मारली.

त्याने मुंबई शहरचा सचिन चौगुले याला एक चाकी डाव टाकून चीतपट करत सुवर्णपदक पटकावले. हा विजय अहिल्यानगरसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. ही स्पर्धा श्री संत सदगुरु गोदड महाराज क्रीडा नगरीत होत असून, आमदार रोहित पवार मित्र परिवाराने याचे आयोजन केले आहे.
स्पर्धेचा दुसरा दिवस खूपच रंगतदार ठरला. गादी आणि माती विभागातील कुस्त्यांसह महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील लढतींना सुरुवात झाली. ५७ किलो गादी वजनी गटाच्या अंतिम फेरीत सचिन मुरकुटेने मुंबईच्या सचिन चौगुलेचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
त्याचवेळी ६५ किलो गादी विभागात उपांत्य फेरीत हर्षवर्धन भुजबळकरने प्रितेश भगतला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत साताऱ्याचा विशाल सुळ याने छत्रपती संभाजीनगरच्या करण बागडेला पराभूत केले. आता ६५ किलो गटाचे सुवर्णपदक विशाल सुळ आणि हर्षवर्धन भुजबळकर यांच्यातील लढतीत ठरणार आहे.
७४ किलो गादी विभागातही चुरस पाहायला मिळाली. पुणे शहरचा आकाश दुबे याने सांगलीच्या योगेश मोहितेला उपांत्य फेरीत हरवून अंतिम फेरी गाठली. दुसरी उपांत्य लढत कोल्हापूरचा सचिन बाबर आणि पुणे जिल्ह्याचा केतन खारे यांच्यात झाली, ज्यात केतन खारे विजयी ठरला.
आता आकाश दुबे आणि केतन खारे यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल. माती विभागातही लढतींनी प्रेक्षकांची मने जिंकली.
५७ किलो माती गटात सांगलीचा स्वप्निल पत्रार याला पुण्याच्या यश बुदगुडेनं हरवलं, तर सोलापूरचा विशाल सुरवसे याला कोल्हापूरचा अजिंक्य कुंद्रे मानकरने पराभूत केले. यश बुदगुडे आणि अजिंक्य कुंद्रे मानकर आता सुवर्णपदकासाठी भिडणार आहेत.
६५ किलो माती विभागात सोलापूरचा अनिकेत शिंदे याला पुणे जिल्ह्याचा सुरज कोकाटे याने उपांत्य फेरीत हरवले, तर जालन्याचा इमरान सय्यद याला सांगलीचा तेजस पाटील याने पराभूत केले. आता सुरज कोकाटे आणि तेजस पाटील यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
७४ किलो माती गटात अहिल्यानगरचा प्रकाश कारले याला पुणे शहरचा श्रीकांत दंडे याने हरवले, तर बुलडाण्याचा संकेत हजारे याला पुणे जिल्ह्याचा सागर वाघमोडे याने पराभूत केले.
यामुळे श्रीकांत दंडे आणि सागर वाघमोडे यांच्यात सुवर्णपदकाची लढत रंगणार आहे. सचिन मुरकुटेच्या विजयाने सुरू झालेली ही स्पर्धा अहिल्यानगरसाठी खास ठरत आहे.