Mumbai Metro News : महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर यांसारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरु करण्यात आली असून या मेट्रो मार्गांचा विस्तार ही आता युद्ध पातळीवर केला जात आहे. मुंबई बाबत बोलायचं झालं तर मुंबई शहर समवेतच मुंबई उपनगर मध्ये देखील मेट्रो सुरू करण्यात आली आहे.
दुसरीकडे येत्या काही वर्षांनी मुंबई महानगर प्रदेशात 374 किलोमीटर लांबीचे मेट्रो नेटवर्क विकसित केले जाणार असून याच 374 किमी मेट्रो नेटवर्कपैकी बहुतांश मार्ग येत्या दोन वर्षात म्हणजेच 2027 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान आता आपण आगामी दोन वर्षांमध्ये मुंबईमधील कोणकोणते मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी खुले होऊ शकतात याचा एक आढावा आजच्या या आर्टिकल मधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणकोणते मेट्रो मार्ग सुरू होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची असलेली मेट्रो लाईन येत्या दोन महिन्यात सुरू होईल असा अंदाज आहे, हा मेट्रो मार्ग 3 जूनपर्यंत पूर्णतः सुरू होणार असून, कुलाबा ते कफ परेड असा प्रवास मेट्रोने करता येणे शक्य होणार आहे.
तसेच, कसारवडवली ते गाईमुखला जोडणारी मेट्रो 4A, कसारवडवली ते कॅडबरी या मेट्रो 4 चा एक भाग आणि दहिसर ते मिरा रोडसाठी असलेली मेट्रो 7A वर्षाअखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल असा दावा केला जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात सांगितले की, 2014 ते 2019 दरम्यान सुरू झालेल्या बहुतेक मेट्रो प्रकल्पांच्या कामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि लवकरच हे मार्ग प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहेत.
यातील मेट्रो 2B चा दुसरा टप्पा, जो डीएन नगर ते मंडाळे दरम्यान आहे, ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मेट्रो 3 चे 95 टक्के काम पूर्ण झाले असून, त्यावर सुरक्षेच्या चाचण्या देखील करण्यात आल्या आहेत.
मेट्रो 4 चे 79 टक्के काम झाले असून, कॅडबरी जंक्शन ते गांधी नगर हा टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत कार्यान्वित केला जाईल. मात्र, यावर्षीच्या अखेरीस कसारवडवली ते कॅडबरी हा टप्पा प्रवाशांसाठी खुला केला जाणार असाही एक अंदाज वर्तवला जात आहे.
ठाणे मेट्रोचा पहिला टप्पा, जो ठाणे ते भिवंडी दरम्यान आहे, 80 टक्के पूर्ण झाला आहे. तसेच, भिवंडी ते कल्याण हा दुसरा टप्पा भुयारी मार्गाने तयार केला जाणार आहे, कारण 5 किमीच्या या पट्ट्यात उड्डाणपूल मेट्रोसाठी मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन करावे लागले असते.
आंतरराष्ट्रीय विमानतळाला अंधेरीशी जोडणारी मेट्रो 9 सध्या 55 टक्के पूर्ण झाली असून, ती डिसेंबर 2026 पर्यंत कार्यान्वित करण्याचा मानस आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मुंबई आणि परिसरातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुकर होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नक्कीच मुंबई शहरात उपनगरात तसेच ठाण्यात प्रस्तावित असणाऱ्या या मेट्रो मार्गांची कामे आगामी काही महिन्यांमध्ये पूर्ण झाली तर याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होईल आणि पर्यावरण पूरक वाहतूकीचा पर्याय मोठा दिलासा देणारा राहील.