शिर्डीतील गुन्हेगारीला मुळापासून उखडणार, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा ठाम निर्धार

Published on -

शिर्डी: शिर्डीतील अतिक्रमणांवर मी ठाम भूमिका घेतली आहे आणि ती कदाचित काहींना टोकाची वाटेल. पण या अतिक्रमणांच्या आडून गुन्हेगारांना आश्रय मिळत असेल, त्यांना लपण्यासाठी जागा मिळत असेल, तर ही अतिक्रमणे हटवणं अत्यंत गरजेचं आहे.

कितीही टीका झाली तरी माता, भगिनी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी हा कठोर निर्णय घ्यावाच लागेल, असं माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत ठणकावून सांगितलं.

शिर्डीत कनकुरी रस्त्यावर उभं राहत असलेलं श्री साई संत सेना महाराज मंदिराचं काम पूर्ण करण्यासाठी कसलीही कमतरता पडू देणार नाही.

विशेषतः सभामंडपासाठी किमान २० लाखांचा निधी देण्यात येईल आणि हे कामही झपाट्याने सुरू करू, असं आश्वासन डॉ. विखे पाटील यांनी दिलं.

राज्यभरातून आलेल्या नाभिक बांधवांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं. अहिल्यानगरच्या उत्तर विभाग महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि शिर्डी नाभिक संघटनेतर्फे आयोजित कार्यगौरव पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिक महामंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ताजी अनारसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, दैनिक लोकआवाजचे मुख्य संपादक विठ्ठल लांडगे, नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीमामा झुंजार, अभयभैय्या शेळके पाटील, गोपीनाथ बनकर, पोपट शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय महामंडळाचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम वाघ,

तसेच कोषाध्यक्ष रामदास पवार, संघटक विकासभाऊ मदने, सहचिटणीस मारोती टिपुगडे, सल्लागार दिलीप अनारसे, उपाध्यक्ष विष्णू वखरे, कार्यकारिणी सदस्य सुधाकर आहेर, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, कार्याध्यक्ष नंदकुमार मोरे, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष उन्मेश रिंदे,

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष दिलीप गवळी, ज्येष्ठ नेते दादासाहेब काळे, अमरावती विभागाचे उपाध्यक्ष मंगेश माळी, बाळासाहेब व्यवहारे, सुनील गायकवाड, शशिकांत सोनवणे, संजय बिडवे, संतोष वाघमारे, भारत तोडकर, वैभव बिडवे यांच्यासह राज्यभरातील नाभिक महामंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य हजर होते.

डॉ. विखे पाटील म्हणाले, “दिवंगत लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी सर्व समाजाशी जिव्हाळ्याचं नातं जपलं. नाभिक समाजानंही विखे पाटील कुटुंबाला नेहमीच भरभरून प्रेम दिलं.
म्हणूनच नगर, पाथर्डी, राहता येथील नाभिक समाजाच्या मंदिरांसाठी आणि सभामंडपांसाठी आमच्या कुटुंबानं मनापासून मदत केली. आता श्री संत सेना महाराज मंदिरासाठीही निधीची कमतरता पडू देणार नाही.”

महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीमामा झुंजार, काका कोयटे, विठ्ठल लांडगे, दत्ताजी अनारसे, शांताराम राऊत यांच्यासह मान्यवरांनी आपली मनोगतं व्यक्त केली.

उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे यांनी प्रास्ताविक केलं, तर प्रदेश संघटक विकासभाऊ मदने यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. बाळासाहेब व्यवहारे यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe