अहिल्यानगर : कापड बाजारातील एका व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. या परिसरातील वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कापड बाजारात स्वतंत्र पोलिस चौकी स्थापन करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
या मागणीसाठी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

कापड बाजारातील एम. जी. रोडवर असलेल्या गुरनुर कौर आणि परमिंदरसिंग नारंग यांच्या कापड दुकानासमोर हातगाडी उभी करून गर्दी केली जात होती. याविषयी दुकानदारांनी आक्षेप घेतल्याने शनिवारी त्यांच्या मुलीला काही गुंडांनी अमानुष मारहाण केली.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात आजमत उर्फ अज्जू खान, त्याचा भाऊ आर्शद आसिफ खान, आदनान नदिम शेख आणि शाहिद पिंजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नो-हॉकर्स झोन असतानाही काही लोक रस्त्यावर अतिक्रमण करून जबरदस्तीने हातगाड्या लावत आहेत. यामुळे दुकानदारांना त्रास सहन करावा लागत असून, या गोष्टीकडे पोलिस आणि महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
या पूर्वीही अशाच परिस्थितीत व्यापारी दीपक नवलानी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र, पोलिस प्रशासन अद्याप ठोस पावले उचलताना दिसत नाही.
कापड बाजार परिसरात स्वतंत्र पोलिस चौकी स्थापन करावी. अतिक्रमण करणाऱ्या हातगाडीवाल्यांवर कारवाई करावी.बाजारात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस गस्त वाढवावी, अनधिकृत लोकांची चौकशी करून त्यांची ओळख पटवावी. अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. “नगरमध्ये खरेदीसाठी राज्यभरातून ग्राहक येतात. त्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे,” असे सांगत त्यांनी प्रशासनाला ठोस कारवाईचे निर्देश दिले.
“व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा आणि आपल्या दुकानासमोर अतिक्रमण होऊ देऊ नये. महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काही लोक बाहेरून येऊन या गुंडांना पाठबळ देत आहेत, त्यांनाही आम्ही सडेतोड उत्तर देऊ,” असा इशाराही जगताप यांनी दिला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अमोल गाडे, डॉ. सागर बोरुडे, संतोष ढाकणे, बलदेवसिंग वाही, प्रदीप पंजाबी, महेश मध्यान, राकेश गुप्ता, रणजितसिंग चावला, हितेश ओबेराय, विकी मल्होत्रा, परमिंदरसिंग नारंग, अनिल सबलोक आदी व्यापारी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांच्या मागण्यांची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी “अतिक्रमण आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना केली जाईल,” असे आश्वासन दिले आहे. पुढील काही दिवसांत कापड बाजार परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हा विषय आता गंभीर बनला असून, प्रशासनाकडून लवकरच ठोस पावले उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.