ब्रेकिंग : महाराष्ट्राला मिळणार एक नवा रेल्वे मार्ग ! 1 हजार 886 कोटी रुपयांच्या ‘या’ Railway मार्गाला राज्य सरकार देणार 943 कोटी रुपयांचा निधी

Maharashtra Railway News : महाराष्ट्रात आणि देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. कारण असे की रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हा प्रवास खिशाला परवडणार आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाच्या माध्यमातून सातत्याने रेल्वेचे नेटवर्क विस्तारले जात आहे.

देशात अजूनही अनेक मोठमोठ्या रेल्वे मार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच आता महाराष्ट्राला आणखी एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्हा आता रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काल एक एप्रिल 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे 943 कोटी 25 लाख रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

यामुळे या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. हा रेल्वे मार्ग प्रकल्प गडचिरोली या नक्षल प्रभावी जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा क्रांतिकारी ठरणार आहे. यामुळे गडचिरोली सहित विदर्भाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

गडचिरोली रेल्वे चा नकाशा वर आल्यास तेथील मागासपण दूर होईल आणि विकासाची गंगा वाहील अशी आशा आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला जाणारा हा निधी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्पासाठी राज्य सरकारने 50 टक्के आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे. सध्या या प्रकल्पाचा एकूण खर्च 1 हजार 886 कोटी 5 लाख रुपये इतका असून त्यापैकी अर्धा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.

आतापर्यंत राज्य सरकारने 288 कोटी 85 लाख रुपये वितरित केले असून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत सुरू होईल आणि हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकतो असा विश्वास आता व्यक्त होऊ लागला आहे.

दरम्यान, हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्हा रेल्वे मार्गाने जोडला जाईल, ज्यामुळे येथील विकास प्रक्रियेला गती मिळेल आणि वाहतूक सुलभ होईल असे जाणकार लोकांचे म्हणणे आहे.