साखर कारखान्यांच्या निवडणुकांमुळे अहिल्यानगरमध्ये राजकीय संघर्ष पेटणार! विखे-थोरात पुन्हा आमनेसामने?

Published on -

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. कारण, दोन्ही गटांच्या प्रभावाखालील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

तनपुरे साखर कारखान्याच्या अंतिम मतदारयादीची घोषणा झाल्याने ही निवडणूकही कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांमुळे विखे आणि थोरात गटांमध्ये पुन्हा एकदा राजकीय रणसंग्राम रंगणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत. विधानसभा निवडणुकीत थोरात आणि विखे यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळाला होता. थोरात गटाने विखे यांच्या गणेश सहकारी साखर कारखान्यात त्यांचे पॅनल पराभूत केले होते.

याच संघर्षाचा बदला घेत, विधानसभा निवडणुकीत विखे समर्थक अमोल खताळ यांनी संगमनेर मतदारसंघात थोरात यांना पराभवाचा धक्का दिला. या पराभवानंतर आता थोरात यांचे वर्चस्व असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घोषित झाली आहे.

या निवडणुकीत विखे आणि अमोल खताळ थोरात यांना जोरदार आव्हान देतील, अशी चिन्हे आहेत. तसेच, विखे यांच्या प्रभावाखालील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (प्रवरा) सहकारी साखर कारखान्याचीही निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे गणेश कारखान्यानंतर आता थोरात गट विखे यांना प्रवरा कारखान्यातही आव्हान देईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे दोन्ही गटांत पुन्हा एकदा तिखट संघर्ष होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे.

या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्या गटाचा सामना माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या गटाशी होण्याची शक्यता आहे. यामुळे तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विखे कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: ३ ते ९ एप्रिल
उमेदवारी अर्जाची छाननी: ११ एप्रिल
अर्ज माघार घेण्याची मुदत: १५ ते २९ एप्रिल
मतदान: ९ मे
मतमोजणी: १० मे

यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असून, विखे-थोरात संघर्षाचा पुढील अध्याय आता साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये दिसणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe