अहिल्यानगर :- राज्य सरकारने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (सेतू केंद्र) दुप्पट करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा लाभ नागरिकांना अधिक सोयीस्करपणे मिळणार आहे.
सध्या जिल्ह्यात २०८३ सेवा केंद्रे कार्यरत आहेत, मात्र ती आता दुप्पट केली जाणार आहेत. यासोबतच, सेवा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. आधी ३३.६० रुपये आकारले जात असले तरी आता ५० रुपये शुल्क लागू करण्यात आले आहे.

नागरिकांना घरबसल्या सेवा मिळावी यासाठी १०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधी आदेश काढले आहेत. सन २०१८ मध्ये सेतू केंद्र स्थापन करण्यासाठी ठरवलेले निकष साडेसहा वर्षांनंतर बदलण्यात आले आहेत. लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन नवीन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आपले सरकार सेवा केंद्रां’मध्ये नागरिकांना ४२० प्रकारच्या शासकीय दाखल्यांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या केंद्रांद्वारे प्रमाणपत्रे, उत्पन्न दाखले, रहिवासी प्रमाणपत्रे, जमीन महसूल नोंदी यांसारख्या महत्त्वाच्या सेवांसाठी शुल्क वाढवण्यात आले आहे. ५० रुपयांच्या नव्या शुल्काचे वाटप असे असेल ५% – राज्य सेतू केंद्र, २०% – महाआयटी सेवा, १०% – जिल्हा सेतू सोसायटी ६५% – सेवा केंद्र चालक.
ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालवण्याची जबाबदारी ऑपरेटरवर होती, मात्र काही ठिकाणी हे ऑपरेटर केंद्राच्या बाहेरच ‘आयडी’चा वापर करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या नावानेच आयडी दिले जाणार आहेत. तसेच, जिल्ह्यातील १२३४ ग्रामपंचायतींमध्ये नवीन सेवा केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
नवीन निकषांनुसार प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात २ सेवा केंद्रे असतील. मात्र, ५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये किमान ४ केंद्रे सुरू केली जातील.
शहरी भागात १० हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्रे, नगरपंचायतींमध्ये किमान २ केंद्रे, ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतींसाठी किमान ४ केंद्रे असणार आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना जवळच्या केंद्रावर अधिक सोयीस्कर सेवा मिळण्यास मदत होईल, तसेच डिजिटायझेशन आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढण्यास हातभार लागेल.