अहिल्यानगरमध्ये मढी-मायंबानंतर या भागामध्ये उभा राहणार रोप वे प्रकल्प, अंमलबजावणीचे आदेश जारी

Published on -

राजूर (अकोले) : महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि गडकिल्ल्यांमध्ये मानाचे स्थान असलेल्या हरिश्चंद्रगडावर आता रोपवे उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

२०२२-२३च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वतमाला’ ही योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेद्वारे डोंगराळ भाग, गर्दीची शहरे आणि दुर्गम स्थळांना रोपवेने जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. परिणामी धार्मिक स्थळे आणि निसर्ग पर्यटन केंद्रांचे महत्त्व वाढेल. सार्वजनिक बांधकाम विभागाने १९ मार्च रोजी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आदेश जारी केले आहेत.

१,६४६ मीटर उंचीवरील कळसूबाई शिखर हे अहिल्यानगर (नगर) आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर वसले आहे. हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असून येथे कळसूबाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. अकोले व इगतपुरी तालुक्यांतून येथे जाण्यासाठी मार्ग आहेत. रोपवे प्रकल्पामुळे वयोवृद्ध, दिव्यांग आणि लहान मुलांसाठी शिखरावर जाणे सुलभ होणार आहे.

अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हरिश्चंद्रगड हा ट्रेकर्स, गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींसाठी लोकप्रिय स्थळ आहे. गडावर प्राचीन शिवमंदिर, पौराणिक लेणी, विस्तीर्ण गुहा आणि गूढ शांतता पर्यटकांना भुरळ घालते. विशेषतः येथील कोकणकडा हा निसर्गाचा अद्भुत आविष्कार मानला जातो. अकोले तालुक्यातील पाचनई मार्गे आणि जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर मार्गे येथे जाता येते.

कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड येथे रोपवे सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांकडून अनेक वर्षांपासून होत होती. हा प्रकल्प साकार झाल्यास पर्यटन अधिक सुलभ होईल, गिर्यारोहणाला पर्याय उपलब्ध होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल.

या प्रस्तावित रोपवेच्या जागेचा प्रश्न सुटण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने इतर शासकीय विभागांकडून जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, खासगी जमिनी असल्यास कायदेशीर प्रक्रियेनुसार त्या ३० वर्षांच्या भाडेपट्टीवर घेतल्या जाणार आहेत.

या रोपवेचा मार्ग नेमका कोणत्या तालुक्यातून जाणार, याबाबत पर्यटक आणि स्थानिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe