अहिल्यानगर : कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी ५९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याच्या उद्देशाने ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यात येणार असून, या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता होणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे तुकाई प्रकल्पाला गती मिळणार असून, कर्जत परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल.
२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी, २५१ ते ६०० हेक्टर सिंचनक्षमतेच्या नवीन व प्रगतीपथावरील लघुसिंचन प्रकल्पांसाठी शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित केला होता. त्यातील ७ कोटी ५० लाख रुपये तुकाई योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
या योजनेअंतर्गत कर्जत परिसरातील २४ पाझर तलाव आणि तीन लघु प्रकल्प (ल. पा. तलाव) भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागातील १९ गावांतील पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून प्रा. राम शिंदे यांनी विधानभवनात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक घेतली होती. त्यानंतर या योजनेसाठी तातडीने निधी वितरित करण्याचे आदेश दिले गेले.
या निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच सिंचन व्यवस्थेचा विकास होऊन शेती उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.