RTE Admissions 2025 : महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीच्या शिक्षणहक्क कायदा (RTE) अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेत पुणे जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी झालेल्या प्रवेश प्रक्रियेत पुण्यातील पालकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश दिला जातो, मात्र यंदा पुणे जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी या योजनेअंतर्गत दाखल झाले आहेत. ठाणे आणि नाशिक हे जिल्हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
पुण्यात आरटीई प्रवेशाची संख्या अधिक असण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या मोठी असून, या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण तसेच उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करतात. याशिवाय, पुण्यात शाळांचे प्रमाण अधिक असल्यामुळे आरक्षणांतर्गत प्रवेशासाठी जागांची संख्याही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे.

राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी
राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी पाहिली तर एकूण 8,863 शाळांमध्ये 1,09,102 जागा उपलब्ध होत्या. या प्रवेश प्रक्रियेसाठी तब्बल 3,05,151 अर्ज आले होते, मात्र त्यापैकी 1,01,967 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आतापर्यंत 69,687 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील परिस्थिती पाहता, येथे 960 शाळांमध्ये 18,498 जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी 61,573 अर्ज आले असून, त्यापैकी 18,161 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आतापर्यंत 12,237 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे.
आरटीई अंतर्गत कोणत्या शाळांमध्ये सर्वाधिक मागणी आहे, याकडे लक्ष दिल्यास, पुण्यातील पोदार शाळेतील 71 जागांसाठी तब्बल 3,376 अर्ज आले होते. काही पालक आपल्या घरापासून दूर असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज भरतात, मात्र त्या शाळा नियमांनुसार पात्र नसल्यास अशा अर्जांना नाकारले जाते. शिवाय, काही पालक एकाच वेळी अनेक शाळांसाठी अर्ज करतात, त्यामुळे त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता असते. (RTE Admissions 2025 )
अर्ज करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
पालकांनी आरटीई अंतर्गत अर्ज करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य प्रकारे अर्ज भरल्यास प्रवेश मिळण्याची संधी वाढते. प्रसिद्ध शाळांऐवजी प्रवेशासाठी पात्र शाळांची निवड करणे सोईस्कर ठरू शकते. अर्ज प्रक्रियेत चुकीची माहिती भरल्यास अर्ज बाद केला जाण्याची शक्यता असल्याने काळजीपूर्वक सर्व माहिती भरावी.
आरटीई अंतर्गत मिळणाऱ्या मोफत शिक्षणामुळे हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तरीही, काही जागा रिक्त राहिल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी या प्रक्रियेत सहभागी होताना आवश्यक ती सर्व माहिती मिळवून योग्य पद्धतीने अर्ज करणे महत्त्वाचे आहे.