नागपूरकरांसाठी खुशखबर! आता 24 तास सुरू राहणार नागपूर विमानतळावरील विमानसेवा

Published on -

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली असून आता नागपूर विमानतळ २४ तास उड्डाणांसाठी खुला झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले ‘रि-कॉर्पेटिंग’ काम ३१ मार्च २०२५ रोजी पूर्ण झाले. यामुळे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत विमानसेवा बंद ठेवण्याची आवश्यकता संपली आहे.

धावपट्टी कार्यान्वित झाल्यामुळे नागपूर विमानतळावरून नव्या विमानसेवा सुरू होणार आहेत. उन्हाळ्याच्या वेळापत्रकानुसार इंडिगो आणि स्टार एअर या विमान कंपन्या कोल्हापूर, जयपूर आणि नोएडा या तीन शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार आहेत.
स्टार एअर – नागपूर-कोल्हापूर-नागपूर मार्गाची नवीन सेवा सुरू करणार आहे. हे विमान दुपारी ३:४५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि ४:१५ वाजता पुढील उड्डाणासाठी रवाना होईल.

इंडिगो एअरलाईन्स – नागपूर-जयपूर-नागपूर आणि नागपूर-नोएडा उड्डाणे सुरू करणार आहे. नागपूरहून नोएडासाठी निघणारे विमान दुपारी ४:३० वाजता उपलब्ध असेल.

सध्या नागपूर विमानतळावरून दररोज ३३ विमानांचे आगमन-जाणे होत आहे. नव्या वेळापत्रकानुसार इंदूर, कोलकाता, पुणे, बंगळुरू आणि दिल्लीसाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

इंदूर – २६ जुलैपासून विमान दुपारी १२:३५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि १२:१० वाजता परतीसाठी रवाना होईल.

कोलकाता – ३० जुलैपासून दर बुधवारी दुपारी १२:१५ वाजता विमान नागपूरला पोहोचेल आणि १२:४५ वाजता पुढे दिल्लीला रवाना होईल.

बंगळुरू – २:२० वाजता नागपूरला पोहोचेल आणि २:५५ वाजता बंगळुरूकडे निघेल.

या नव्या विमानसेवांमुळे नागपूर विमानतळावर विमानांची संख्या आणि प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. २४ तास विमानसेवा सुरू झाल्यामुळे आता नागपूरमधून अधिकाधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मार्ग मोकळा झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News