अहिल्यानगर- केडगाव परिसरासह नगर तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील गहू पिकाची काढणी सुरू असून, मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिके सोंगणीस आली असून, पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी तातडीने गहू घरात आणण्याच्या हालचालीत व्यस्त आहेत.

हार्वेस्टरसाठी शेतकऱ्यांची गर्दी
पारंपरिक पद्धतीने काढणीस तुलनेत हार्वेस्टर मशीनद्वारे गहू काढणे अधिक वेगवान आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याने शेतकरी मशीनकडे झुकू लागले आहेत. तथापि, एकाचवेळी संपूर्ण तालुक्यात मागणी वाढल्याने हार्वेस्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
यांत्रिकीकरणाला पसंती
गेल्या काही वर्षांत पारंपरिक शेतीतील बैलजोड्या कमी झाल्या असून, त्याजागी ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरचा वापर वाढला आहे. एकरी केवळ दोन हजार ते बावीसशे रुपये खर्चात अर्ध्या तासात गहू काढणी पूर्ण होऊ शकते, हे लक्षात घेता, हार्वेस्टरला पसंती मिळत आहे.
“पारंपरिक पद्धतीने गहू काढायला चार ते पाच हजार रुपये खर्च येतो, त्यामुळे हार्वेस्टरच योग्य,” — अशोक गायकवाड, शेतकरी, कापूरवाडी
नगर तालुक्यात यंदा सुमारे १५,५०० हेक्टर क्षेत्रावर गहू पेरणी झाली आहे. अनेकांनी उशिरा पेरणी केली असून, आत्ता अचानक आलेल्या पावसामुळे तेही सोंगणीस लागले आहेत. ढगाळ हवामान आणि गारपीटीची शक्यता असल्यामुळे शेतकरी गव्हाची तात्काळ काढणी करत आहेत.
वाढती महागाई आणि मजुरांची टंचाई
शेतीकामांसाठी मजुरांचीही मोठी टंचाई जाणवत आहे. मजुरांच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून, एकरी चार ते पाच हजारांपर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे हार्वेस्टरचा पर्याय अधिक सोयीचा व स्वस्त मानला जात आहे.
“पावसाळी वातावरणात वेळ न गमावता गहू वेगाने काढणे गरजेचे बनले आहे, म्हणून हार्वेस्टर हाच उपाय,” — शाम चोभे, शेतकरी, बाबुर्डी बेंद
पावसाचे संकट आणि यांत्रिकीकरणाकडे वळलेली शेती यामुळे गहू काढणीच्या प्रक्रियेत मोठा बदल दिसून येतो आहे. मात्र, यंत्रांची अपुरी उपलब्धता, मजुरांच्या दरवाढीचा फटका आणि हवामानातील अनिश्चितता या सर्व घटकांनी शेतकऱ्यांसमोर नवा पेच निर्माण केला आहे.