अहिल्यानगर- श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गावरून वाद निर्माण झाला आहे. पोलिस प्रशासनाने यंदाही बॉम्बे बेकरी, चांद सुलताना स्कूल या मार्गालाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, हिंदुत्ववादी संघटना आणि आयोजक पारंपरिक आशा टॉकीज, कोतवाली पोलिस ठाणे मार्गावरूनच मिरवणूक काढण्यावर ठाम असून, पोलिसांनी मिरवणूक अडविल्यास ती जागेवरच थांबवण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

आमदार संग्राम जगतापांचा पाठिंबा
हिंदुत्ववादी संघटनांनी आशा टॉकीज मार्गाला पारंपरिक मार्ग संबोधत त्या मार्गानेच मिरवणूक निघावी, ही मागणी केली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी देखील या मागणीला पाठिंबा देत, परंपरेनुसार मिरवणूक काढणार असल्याचे जाहीर केले आहे. या मार्गाशी संबंधित लोकांच्या भावना आणि गेल्या अनेक वर्षांचा इतिहास लक्षात घेता, कार्यकर्ते जुन्याच मार्गावर ठाम आहेत.
पोलिस प्रशासनाचा ठाम निर्णय
दुसरीकडे, पोलिस प्रशासनाने सन २०१६ पासून ठरलेल्या नवीन मार्गालाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आयोजकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व बंदोबस्ताची तयारी करण्यात येत असल्याचे सांगितले. अनुचित प्रकार घडल्यास तातडीने कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पोलिसांकडून बंदोबस्ताची तयारी
मिरवणुकीच्या मार्गावरून निर्माण झालेला तणाव लक्षात घेता, पोलिसांनी सुरक्षेची काटेकोर तयारी सुरू केली आहे. हेल्मेट, लाठी, ढाल यांसारख्या साधनांची तपासणी केली जात असून, आवश्यक असल्यास नवीन साहित्य मागवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे सांगत आहेत.
चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन
सध्याची परिस्थिती पाहता, संवादातून या वादावर तोडगा काढणे गरजेचे ठरत आहे. श्रीरामनवमीसारख्या धार्मिक उत्सवाचे सौहार्दपूर्ण वातावरण राखण्यासाठी प्रशासन आणि आयोजक यांच्यात समन्वय आवश्यक आहे. अन्यथा, तणाव वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आयोजकांच्या भावना आणि परंपरेचा आदर राखत शांततेत मार्ग काढणे ही काळाची गरज आहे.