शिर्डी- साईबाबांच्या दर्शनासाठी पुणे येथून शिर्डीकडे येणाऱ्या साईभक्तांसाठी आता एक सुखद बातमी आहे. पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा राहाता ते संगमनेर तालुक्यातील पानोडी हा नवीन ३६ किलोमीटरचा काँक्रीट रस्ता सुमारे १५४ कोटी रुपये खर्चून तयार केला जात आहे. या मार्गामुळे पुणे-शिर्डी दरम्यानचं अंतर सुमारे ५० ते ६० किलोमीटरने कमी होणार असून, प्रवास अधिक सोयीचा व जलद होणार आहे.
कसा असणार आहे मार्ग?
हा रस्ता राहाता, दहेगाव, केलवड, पिंपरी-लोकाई, लोहारे, निमगाव जाळी, आश्वी, शिपलापूर आणि पानोडी या गावांतून जाणार आहे. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला तो जोडणार असल्यामुळे केवळ भाविकांनाच नाही, तर स्थानिक रहिवासी, शेतकरी व व्यवसायिकांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.

रस्त्याची रचना कशी असणार?
रस्त्याची रुंदी ७ मीटर असून, दोन्ही बाजूंना दीड मीटर मुरूमीकरण केल्याने एकूण रस्ता १० मीटरचा दोन पदरी असेल. विशेष म्हणजे केलवड, आश्वी आणि शिपलापूर या मोठ्या गावांमध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण १० मीटर पर्यंत करण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही बाजूंनी प्रत्येकी एक मीटरचे पेव्हिंग ब्लॉक आणि १.२ मीटरचे साईड गटार असेल. त्यामुळे या गावांमधील रस्त्याची एकूण रुंदी १४.५ मीटर इतकी असेल.
३० महिन्यांत काम पूर्ण
ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेले हे काम ३० महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. केलवड ते दहेगावदरम्यानचा जुना डांबरी रस्ता फोडून नवीन कामाला सुरुवात झालेली आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ, मुंबई यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
पर्यटनाला चालना मिळणार
या मार्गामुळे फक्त प्रवासच कमी वेळात आणि अंतरात पूर्ण होणार नाही, तर शिर्डीच्या आसपासचा तीर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखडाही मजबूत होणार आहे. जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, “जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांसाठी पायाभूत सुविधा आणि कमी अंतराचे रस्ते विकसित करणे हे महत्त्वाचे असून, हा प्रस्तावित मार्ग भाविक, नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल.”
हा नवीन रस्ता साईभक्तांसाठी पुणे ते शिर्डी प्रवासात एक नवा, जलद व अधिक सुरक्षित पर्याय ठरणार आहे.