Mumbai To Goa : तुम्ही मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करतात का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. खरे तर सध्या मुंबई ते गोवा हा प्रवास फारच क्लिष्ट बनला आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास हा फारच आव्हानात्मक बनला असून अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम जवळपास पंधरा वर्षांपासून रखडले आहे आणि याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई ते गोवा दरम्यान जलवाहतूक सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई ते गोवा रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती दिली आहे. ही सेवा सुरू झाल्यास ती प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा ठरेल.
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सरनाईक यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या मीरा-भाईंदर ते वसई-विरार या भागात रो-रो सेवा कार्यरत आहे आणि त्याच धर्तीवर मुंबईहून गोव्यापर्यंत अशीच सेवा सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती मंत्री महोदयांनी यावेळी दिली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एमएमआर क्षेत्रात जलवाहतुकीला चालना देण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. किनारपट्टी आणि खाडीमुळे जलवाहतूक शक्य असल्यामुळे अनेक जेट्टींचं काम पूर्ण करण्यात आलं आहे.
सध्या सुरू असलेली मुंबई- अलिबाग रो-रो सेवा लोकप्रिय ठरली असून पर्यटक आणि वाहनचालकांना त्याचा मोठा फायदा होत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा सेवा सुरू झाल्यास ती केवळ पर्यटकांसाठीच नव्हे तर नियमित प्रवाशांसाठीही फायदेशीर ठरेल.
या सेवेमुळे कोकणात प्रवास करणाऱ्यांना पर्याय उपलब्ध होईल. जर या मार्गावर अलिबाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी थांबे ठेवले गेले, तर स्थानिकांनाही त्याचा मोठा लाभ होऊ शकतो.
ही सेवा जलद आणि थेट असेल तर कोकणातील पर्यटन, व्यापार आणि प्रवास अधिक सुलभ होईल. राजकीयदृष्ट्या या प्रस्तावावर कोकणातील मंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
बंदर आणि मत्स्यविकास खातं भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या अखत्यारीत असून जेट्टी उभारणीसाठी ते जबाबदार आहेत. तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनही पुढाकार अपेक्षित आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात यावा यासाठी या दोघांच्या सहकार्यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.